पुणे प्रतिनिधी : पुण्यातील मांजरी येथे असलेल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. आग नियंत्रणात आणल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये पाच मृतदेह आढळून आले आहेत. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अधिकृत माहिती दिली आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर लस तयार करत संपूर्ण जगाचा लक्ष वेधून घेतलेल्या पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या बीसीजी प्लांटच्या इमारतीला भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली असून कोव्हिशिल्ड उत्पादन प्रकल्प पुर्णत: सुरक्षित असल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मांजरी येथील टर्मिनल 2 बीसीजी प्लान्ट इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याला आग लागल्यामुळे धुराचे लोट येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभागाच्या 10 गाड्या पोहोचल्या. आग अखेर चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे. सध्या तिथे कुलिंगचे काम सुरू असून पुढील काही तास ते सुरू राहणार आहे.अग्निशमनच्या जवानांनी तीन जणांना सुखरुप बाहेर काढत सुरक्षित स्थळी आणले. आगीचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.