पंढरपूर दि.१४ : पंढरपूर शहरात गेल्या १५ तासांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच आज दुपारी चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. रात्रभर मुसळधार पावसाने कुंभार घाट येथील नवीन घाटाचे बांधकाम कोसळल्याने ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल व आपत्कालीन यंत्रणेने हे सर्व सहा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहेत.
पंढरपुरात पावसाचे धुमशान ; घाटाची भिंत कोसळून ६ ठार
पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन घाट बांधून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. जलसंपदा विभागाकडून हे घाट बांधणीचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. चुना वापरून दगडाचे बांधकाम केलेले आहे. मात्र कुंभार घाटावर असणार हे बांधकाम तिथेच राहणाऱ्या काही लोकांच्या अंगावर कोसळले. यामध्ये आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह मिळाले आहेत. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी उपोषण करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. या ठेकेदारावर गुन्हा दाखल न केल्यास मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कोळी समाजाने घेतली आहे.
कुंभार घाटाजवळील या नवीन घाट सुशोभीकरणाच्या कामाच्या जवळच या लोकांनी छोट्या छोट्या झोपड्या होत्या. त्या ठिकाणी फूल विक्री, प्रसाद विक्री, नारळ विक्रीचा व्यवसाय केला जातो. आज दुपारी दीडच्या सुमारास मुसळधार पावसाने नवीन घाटाचे बांधकाम कोसळले व वीस फूट उंचीची भींत या लोकांच्या अंगावर कोसळली. यामध्ये सहा जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले असून शोधकार्य अजूनही सुरू आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कुणी दबलं आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे.