सलमान खानच्या घराची रेकी करण्यासाठी आलेल्या शार्पशूटरला फरीदाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या
सलमान खानच्या हत्येचा कट उधळला, बिश्नोई टोळीच्या शार्पशूटरला अटक
कुतूहल न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला. सलमानच्या घराची रेकी करुन गेलेला शार्पशूटर राहुल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सलमान खान कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर असल्याचे समोर आले आहे.
27 वर्षीय राहुल उर्फ बाबा उर्फ संगा याला फरीदाबाद पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केली. फरीदाबादमधील तरुणाच्या हत्या प्रकरणात पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्याकडून एक रिव्हॉल्वरही जप्त करण्यात आलं आहे.
हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमधील कुख्यात लॉरेंस बिश्नोई गँगने सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं. काळवीट शिकार प्रकरणात सुटका झाल्यापासून सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर आहे. लॉरेन्स बिश्नोईने सलमानला मारण्याची जबाबदारी शार्प शूटर राहुलला दिल्याचं कबूल केलं आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सांगण्यावरुन राहुलने जानेवारी महिन्यात सलमानच्या घराची रेकी केली होती. सलमान खान राहत असलेल्या वांद्र्यातील गॅलक्सी अपार्टमेंटची पाहणी केली होती. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन लागू केल्यामुळे हा प्लॅन फसल्याचे सांगितले जाते.
मनीष, रोहित, आशिष आणि भरत अशा चौघांनाही राहुलला काही गुन्ह्यात मदत केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. राहुल, भरत आणि आशिष यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, तर अन्य दोघांना स्थानिक कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.