वन्य जीव प्राण्यांच्या शिकारीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
धक्कादायक! सोलापुरात काळवीटाची शिकार, मटन विकताना एकाला बेड्या
कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर, 30 ऑगस्ट: दक्षिण सोलापूर तालुक्यात काळवीट शिकार केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. विशेष म्हणजे काळवीटचं मटन विकताना एकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. नेचर कॉन्झर्वेशन क्लबच्या सदस्यांनी दिलेल्या गोपनिय माहितीवरून वनविभाग आणि ग्रामीण पोलिसांनी ही धाडसी कारवाई केली आहे. विजय भोसले असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. आरोपीनं यापूर्वीही अनेक काळवीट आणि वन्य प्राण्यांची शिकार केल्याचं चौकशीत समोर आलं आहे.
सोलापुरात काळवीट शिकारप्रकरणी एका शिकाऱ्याला वनविभाग आणि ग्रामीण पोलिस दलाने रंगेहाथ अटक केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी येथे हा प्रकार घडला. सोलापुरातील नेचर कॉन्झर्वेशन सर्कलला आलेल्या गोपनिय माहितीच्या आधारे नेचर कॉन्झर्वेशन सर्कल सोलापूर, जिल्हा पोलीस दल आणि वन विभाग सोलापूर यांच्या संयुक्त कारवाईतून हे काळवीट शिकार प्रकरण उघडकीस आलं आहे.
संगदरी येथे काळवीटची शिकार करून त्याचे मांस विक्री होत असल्याची माहिती नेचर कॉन्झर्वेशन सर्कलला मिळाली. माहिती मिळताच त्यांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून सदर घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिस अधिक्षकांनी तात्काळ पोलिसांचे एक पथक नेचर कॉन्झर्वेशन सर्कल सोबत पाठवले. तसेच वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाड टाकली असता काळवीटाची शिकार झाल्याचे उघड झाले.
यावेळी संशयित आरोपीच्या घरातून काळवीटचे मांस, चारही पायाचे खूरं, कातड्याचे तुकडे, शिंगे, नायलॉन वायरचे फासे, कुऱ्हाड, सुरा, वागर, वजन काटा असा मुद्देमाल जप्त करून विजय भोसले या संशयित आरोपीला अटक केली आहे.