सोलापूर प्रतिनधी : कुतूहल न्यूज नेटवर्क
अज्ञात वाहनाच्या धडकेने नवी वेस पोलिस चौकीसमोर एकाचा जागीच मृत्यू
सोलापूर : मेकॅनिक चौक, नवी वेस पोलिस चौकीसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा जागीच चिरडून मृत्यू झाला. ही घटना आज (रविवारी) सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली.
याबाबत सिव्हिल पोलिस चौक येथे नोंद झाली आहे. सोनू पिचेलाल बगेल (वय 55, रा. निराळे वस्ती) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. सोनू बगेल हे रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास मेकॅनिक चौक, नवी वेस पोलिस चौक येथे रस्ता ओलांडत होते. सकाळची वेळ असल्याने रस्ते सामसूम होते. अशा सामसूम रस्त्यावरून सोनू बगेल हे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात ते चिरडले गेले.
पोलिस नाईक एस. एस. चव्हाण यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच सोनू बगेल यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. खुशाल माळवदे यांनी सांगितले. याबाबत सिव्हिल चौक पोलिसांत नोंद झाली असून, पोलिस त्या अज्ञात वाहनाच्या शोधात आहेत.