प्रशासनातर्फे युद्धपाळीवर पंचनामे सुरु, ४५० लोकांचे यशस्वी स्थलांतर
सीना रौद्र झाल्याने नदी काठच्या गावांचे जनजीवन विस्कळीत
कुतूहल न्यूज नेटवर्क
मोहोळ : चित्रा नक्षत्राच्या धुवाधार पावसाने मोहोळ तालुक्यातील सीनानदी काठच्या एकुरके, बोपले, पासलेवाडी , पवारवाडी व परिसरातील गावांना मोठा फटका बसला असून या महापुरात शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे . १०० वर्षात कधी न पाहिलेला पुर सीना काठच्या लोकांनी अनुभवला . यामध्ये एकुरके, देगाव, बोपले येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना शासनस्तरावरून मदत प्राप्त करून देण्यासाठी प्रशासनामार्फत तहसिलदार जीवन बनसोडे यांच्या नियोजनाखाली मंडल अधिकारी राजेंद्र दुलंगे, गाव कामगार तलाठी दिनेश साळुंखे, कृषी सहायक संदिप ढोले, ग्रामसेवक श्री वाघमारे, सहायक तलाठी हनुमंत चव्हाण यांच्या टीमकडून युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येत आहेत तर आतापर्यंत पाच गावातील ४५० लोकांचे स्थलांतर करण्यात प्रशासनाला यश आले आहे .

“अतिवृष्टीमुळे देगाव, एकरके, बापले येथे महापुरात अडकुन पडलेल्या सुमारे ४५० नागरिकांना सुखरूप स्थळी बाहेर काढण्यात प्रशासनाला मोठे यश आले असून तालुका प्रशासन कोणत्याही वेळी मदतीसाठी सज्ज आहे, पावसामुळे कोठेही नैसर्गिक आपत्ती उदभवली तर नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा”.तहसीलदार (मोहोळ ) ,जीवन बनसोडे
“प्रशासनातर्फे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे व पशुधनाचे पंचनामे युद्धपातळीवर सुरु असून नागरिकांनी अजिबात घाबरू नये”.तलाठी- दिनेश साळुंखे .
या महापुरामध्ये सीना नदीकाठचे शेकडो एकर क्षेत्र जलमय झाले असून त्यामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे . सीनानदीकाठचा बहुतांश भाग हा ऊसपट्टा म्हणून ओळखला जातो . पावसाने यंदा समाधानकारक सुरुवात केल्याने परिसरात ऊसाची विक्रमी लागवड झाली आहे . उर्वरीत क्षेत्रावर झालेल्या कांदा, तूर, मका, सोयाबिन व अन्य पिकांना मोठा फटका बसला आहे.
पुरामध्ये एकुरकेतील दलित वस्ती सह गावातील सुमारे २०-२५ घरे व देगावमधील एकुण ३२o लोकांचे जि.प. शाळा व अन्य खासगी शाळेत पुरग्रस्तांना धीर देत त्यांचे यशस्वीरित्या प्रशासनातर्फे पुणर्वसन करण्यात श्री साळुंखे यांना यश आले आहे . तसेच या पुरात देगाव येथील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांच्या जमीनीची प्रचंड हानी झाली असून यात अक्षरशः निसर्गाने पीके ओरबाडून नेली आहेत . येथील विजेचे खांब कोलमाडले असून अनेक शेतकऱ्यांच्या गंजी वाहून गेल्या आहेत . शिवाय अनेक शेतकऱ्यांची शेतातील पत्रा शेड वाहून गेले आहेत .पुरात देगाव – वाळूज रोड पूर्णपणे खचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे .
एकुरके येथील मोल मजूरी करुन उदरनिर्वाह चालवणारे पोपट विलास साठे यांची ४ दुभती गुरे पाण्यात वाहून गेली असून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन सरसावले आहे .