fbpx

आमदार राजेंद्र राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान सप्ताह संपन्न,1035 दात्यांनी केले रक्तदान

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी प्रतिनिधी : कोरोनामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने आ. राजेंद्र राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराने शहर व ग्रामीण भागात दि. 18 ते 25 ऑक्टोंबर दरम्यान रक्तदान शिबिर सप्ताहाचे आयोजन केले. या शिबिरात 1035 रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले.

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर सर्वत्र जनजीवन ठप्प झाले. एकिकडे कोरोना रुग्ण आणि इतर आजाराच्या अत्यवस्थ रुग्णांची रक्ताची मागणी वाढत असताना रक्तदान शिबिराच्या आयोजनावर मात्र मर्यादा आल्यामुळे रक्तपेढीत होणारे संकलन मंदावले. त्यामुळे सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांच्या आवश्यक शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.

बार्शी शहर हे मेडिकल हब असल्याने केवळ तालुक्यातूनच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील अनेक गावांमधून रुग्ण उपचारासाठी बार्शीत येतात. त्यांना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी आ. राऊत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करण्याचे आवाहन तालुक्यातील युवक कार्यकर्त्यांना केले. या आवाहनाला प्रतिसाद देत वाढदिवस सप्ताहात झालेल्या शिबिरात तालुक्यातील हळदुगे 93 उपळाई-49, बावी-112, झरेगाव-95, काटेगाव-50, चारे-35, सारोळे-104, नांदणी-75, उपळे-71 व बार्शी शहरात-350 असे एकूण 1035 दात्यांनी रक्तदान केले. शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी स्वतः रक्तदान करून झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष असिफ तांबोळी, पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, संतोष निंबाळकर,भगवंत ब्लड बँकेचे मार्गदर्शक रावसाहेब मगगिरे, राज-विजय क्रिडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष विजय राऊत, बाबासाहेब कथले आदी उपस्थित होते. या शिबिरात बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत व त्यांचे बंधू रणजीत राऊत यांनीही उत्सफुर्तपणे रक्तदान करून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला व सर्व कार्यकर्त्यांच्या मनावर रक्तदानाचे महत्व बिंबविले.

या रक्तदान सप्ताहास बाजार समितीचे सर्व संचालक, नगरपालिकेतील आ. राऊत गटाचे सर्व नगरसेवक, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच या सप्ताह संयोजनासाठी आ. राजाभाऊ राऊत मित्रमंडळाने परिश्रम घेतले. वाढदिवसानिमित्त आ. राऊत यांनी सर्व अनावश्यक खर्च टाळून कार्यकर्त्यांनी रक्तदानातून आपली सामाजिक बांधिलकी व्यक्त करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला शहर व ग्रामीण भागात अतिशय चांगला प्रतिसाद लाभल्याचे भगवंत ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे यांनी सांगितले. तालुक्यात सर्वत्र रक्तदान शिबिराचे आयोजन करताना कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळत भगवंत ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे आदी कर्मचार्‍यांनी उत्तम संयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *