fbpx

पुण्यात निर्दयी मातेनं नाळ ठेचून नवजात अर्भक फेकलं कचराकुंडीत

दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क

पिंपरी चिंचवड, 28 ऑक्टोबर: नुकतंच जन्मलेलं नवजात अर्भक एका निर्दयी मातेनं कचराकुंडीत फेकून दिल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

शहरातील तापकीर मळा परिसरात बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास रस्ते सफाई करत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी नितीन सुर्यवंशी नामक व्यक्तीने या अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यानं कचराकुंडीत बघितलं असता त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक नवजात अर्भक जीवाचा आकांत करत हंबरडा फोडत होतं. निर्दयी मातेनं या नवजात स्त्री जातीचं अर्भक फेकून दिलं होतं. अर्भकावर एकही कपडा नव्हता. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे मुलीची नाळ ठेचून तोडण्यात आल्यामुळे होणाऱ्या वेदनांनी पहाटेच्या थंडीत अर्भक अक्षरशः विव्हळत असल्याचं नितीन सुर्यवंशी यांनी बघितलं. ही बाब त्यांनी तत्काळ स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना कळवून मुलीला सुरक्षितरीत्या पोलिसांच्या स्वाधीन केलं.

सध्या या चिमुकलीवर पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती ठणठणीत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नढे आणि कुणाल साठे यांनी मुलीच्या उपचारसाठीचा सर्व खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रशांत नढे आणि कुणाल साठे यांनी केली असून वाकड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *