fbpx

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव निलंबित

कुतूहल न्यूज नेटवर्क

चिंचवड : वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. चिंचवड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना त्यांनी एका गुन्ह्यात सकृतदर्शनी पुरावा नसताना गुन्हा दाखल केला. तर तथ्य नसताना दुसरा गुन्हा दाखल केल्याने बेशिस्त, बेजबाबदार आणि निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.

रवींद्र जाधव हे चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान मागील आठवड्यात झालेल्या बदल्यांमध्ये त्यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. चिंचवड पोलीस ठाण्यात वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदावर काम करत असताना जाधव यांनी दोन गुन्हे बेजबाबदारपणे दाखल केल्याचे म्हटले आहे.

१९ ऑक्टोबर २०२० रोजी एका विनयभंगाच्या गुन्ह्यात सकृतदर्शनी पुरावा नसताना देखील गुन्हा दाखल करून त्यातील आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच दिवशी आणखी एक सरकारी कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करून नियमबाह्यपणे सूर्यास्तानंतर एका महिलेला अटक केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची शहानिशा करून योग्य पुराव्यानुसार गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. तसेच पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी, कर्मचारी करत असलेल्या कार्यवाहीवर लक्ष ठेवणे वरिष्ठ निरीक्षकाचे काम आहे. असे असताना जाधव यांनी बेशिस्त, बेजबाबदार आणि निष्काळजीपणा करत दोन गुन्हे दाखल केल्याने १७ नोव्हेंबर पासून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *