कुतूहल न्यूज नेटवर्क
प्रशासक केंद्रप्रमुख श्रीहरी गायकवाड यांनी स्वीकारला पांगरी ग्रामपंचायतीचा कारभार
पांगरी प्रतिनिधी,२१ नोव्हेंबर : सरपंचपदाचा कार्यकाल संपल्यामुळे पांगरी ग्रामपंचायतीचा पदभार प्रशासक केंद्रप्रमुख श्रीहरी गायकवाड यांनी ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहून स्वीकारला.जिल्हा परिषद सदस्या रेखा राऊत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मावळते सरपंच युन्नूस बागवान यांचाही सत्कार करण्यात आला.
बार्शी तालुक्यातील लोकसंख्येच्या व ग्रामपंचायत सदस्य संख्येबाबत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पांगरी ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे वेळेत निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्याचबरोबर पहिल्या ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांची पाच वर्षांची मुदत संपली होती. या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे या कालवधीत गावचा विकास रखडला जाऊ नये, या उद्देशाने प्रशासकामार्फत विकासास चालना मिळणार आहे.
यावेळी रेखा राऊत म्हणाल्या, की गावाच्या विकासाबाबत राजकारण आणू नये. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावाचा विकास साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. गावातील अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे.
पाच वर्षांचा कालावधी सर्वांना मिळून – मिसळून पार पाडल्याबाबत सरपंच युन्नूस बागवान यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी प्रशासक श्रीहरी गायकवाड म्हणाले, की माझ्याच गावात माझी प्रशासक म्हणून नेमणूक झाल्याचे भाग्य मिळाले आहे. सर्वांच्या सहकार्याने गावातील अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
यावेळी ग्रामसेवक संतोष माने, ग्राहक समितीचे तालुकाध्यक्ष विष्णू पवार, माजी सरपंच जयंत म्हसे, दिलीप जानराव, विश्वास देशमुख, गणेश जाधव, विलास लाडे, किशोर बगाडे, संतोष बगाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक संतोष माने यांनीही मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले