fbpx

‘स्वाभिमानी’ने पेटवला उसाचा ट्रक्‍टर

कुतूहल न्यूज नेटवर्क

मंगळवेढा प्रतिनिधी : साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने झाले तरी देखील ऊसदराची कोंडी अद्याप फुटली नाही. शिवाय पहिली उचल अडीच हजारांची मागणी असताना ती कमी दिल्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मरवडे येथे लवंगीच्या भैरवनाथ कारखान्यास ऊस गाळपास जाणारा ट्रॅक्‍टर पेटवला. रात्री दहाच्या दरम्यान वाहने रोखून धरल्याने कर्नाटकात जाणारी वाहतूकही विस्कळित झाली. 

मंगळवेढा तालुक्‍यामध्ये एक सहकारी व तीन खासगी साखर कारखाने आहेत. त्यामधील एक कारखाना सध्या बंद असून, उर्वरित तीन कारखाने सुरू आहेत. साखर कारखाने सुरू होऊन गेले दोन महिने झाले तरीदेखील उसाला किती दर द्यावा, याबाबत निश्‍चित धोरण ठरले नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला पहिली उचल 2500 रुपये द्यावी, ही मागणी लावून धरली असताना, कारखानदारांनी बैठकीत जो दर ठरेल तो दर देण्याचे जाहीर केले. असे असले तरी ऊसदराची बैठक होणार तरी कधी, असा सवाल विचारला जात आहे. 

इतर ठिकाणी उसाला चांगला दर मिळत असताना राज्यात सर्वाधिक जास्त साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे ऊसदरासाठी स्पर्धा होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळणे अपेक्षित असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र साखर कारखानदारांनी एकी करून शेतकऱ्यांच्या माथी कमी दर देण्याचा सपाटा लावला आहे. अगदी तसाच प्रकार या वर्षी सुरू केला. त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष धुमसत असताना अखेर ऊसदराचे हे आंदोलन स्वाभिमानीने सुरू केले आहे. तालुक्‍यात गतवर्षी काही खासगी कारखान्यांनी ऊसबिले शेतकऱ्यांना दिली नाहीत, तर एकाच कारखान्याने एकाच तालुक्‍यात नदीकाठच्या एका गावाला वेगळा दर दिल्याचे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले. त्यामुळे ऊसदराचे हे आंदोलन भविष्यात तीव्र होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *