fbpx

उर्मिला मातोंडकरांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन

कुतूहल न्यूज नेटवर्क

मुंबई,दि.०१ डिसेंबर : बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्याआधी उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त जागेसाठी शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांचे नाव महाविकास आघाडी सरकारने पाठवलं होतं. उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिली होती. त्यानुसार काल दुपारी उर्मिला मातोंडकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर पोहोचल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *