कुतूहल न्यूज नेटवर्क
अकलूज येथील घरफोडीचा पर्दाफाश, 8 लाखांचे दागिने हस्तगत
सोलापूर : सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लॉकडाऊन काळात झालेल्य चोरीचा घटनेचा पर्दाफाश केला आहे. अकलूज येथील रहिवाशी फिर्यादी अतुल अरविंद गांधी यांच्या तक्रारीनंतर अकलूज आणि सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुत्रे फिरवून सापळा रचून आरोपींना जेरबंद केले. तसेच, आरोपींकडून एकूण 12.7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने 86.5 तोळे वजनाचे चांदीचे दागिने, गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन मोटारसायकली आणि 2 मोबाईल असा एकूण 8 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे.
अकलूजच्या जयसिंग चौक, संग्राम नगर येथील रहिवाशी अतुल गांधी यांच्या घराचे कुलूप-कडी तोडून चोरट्यांनी तब्बल 35 तोळे सोने आणि चांदीचे दागिने व 1 लाख 25 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती. 27 मे 2020 ते 8 जून 2020 दरम्यान ही घटना घडली होता. यासंदर्भात गांधी यांनी अकलूज पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली होती. त्यानंतर, सोलापूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन पथके नेमण्यात आली. या पथकातील सहा. पोलीस निरीक्षक शाम बुवा व त्यांचे सहकारी अकलूज टेंभूर्णी पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना या गुन्ह्यातील आरोपींबद्दल गोपीनाय माहिती मिळाली. आरोपींकडून अकलूज येथील जुना बस स्टँड परिसरात हा मुद्देमाल विक्री होत असल्याचे समजल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. त्यावेळी, दोन मोटारसायकलींसह तीन संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीअंती आरोपींनी गुन्हा कबूल करुन दागिन्यांची विक्री करण्यास आल्याचे सांगितले. तसेच, हे दागिने गांधी यांच्या घरातीलच असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, सदर प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिग गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक शाम बुवा, पोलीस हवालदार श्रीकांत गायकवाड, बिरुदेव पारेकर, सलीम बागवान, पोलीस नाईक परशुराम शिंदे, लाला राठोड, मोहिनी भोगे, अजय वाघमारे आणि केशव पवार यांनी ही मोहीम फत्ते केली.