पांगरी-बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथे जमिनीच्या वादातून भावकीतील तीन जणांनी एकाचा जबर मारहाण करून व डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी 7:30 च्या सुमारास उक्कडगाव तालुका बार्शी येथे घडली. सर्जेराव सोमनाथ मुंढे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. (वय 55 वर्ष धंदा शेती राहणार उक्कडगाव ) मयत व्यक्ती सेवानिवृत्त माजी सैनिक होते, या घटनेची पांगरी पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करून घेण्याची प्रक्रिया चालू होती. या घटनेने उक्कडगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जमिनीच्या वादातून उक्कडगाव येथे खून
या बाबत अधिक माहिती अशी कीं मयत सर्जेराव मुंढे व महादेव बाजीराव मुंढे यांच्या मध्ये जमिनीचा वाद होता, याबाबत बार्शीतील दिवाणी न्यायालयात दावा देखील चालू होता. हा दावा आपआपसात मिटवला असताना देखील महादेव मुंढे , गणेश मुंढे , व बाजीराव मुंढे हे तिघेजण हा खटला आम्हाला मिटवायचा नाही म्हणून सतत वाद घालत असत, तसेंच विहिरीचे व बोरचे पाणी देखील आम्ही तुम्हाला देणार नाही व जीवे मारु अशी धमकी वारंवार मयत सर्जेराव मुंढे यांना देत असत. मयत सर्जेराव मुंढे हे दिवसभर शेतात काम करून सोमवारी 6 च्या सुमारास घरी आले व नेहमीप्रमाणे थोडया वेळाने घरातून बाहेर पडले व 7:15 च्या सुमारास ही घटना उक्कडगाव येथील जिल्हा परिषद शाळेपासून जवळ घडली. सध्या सर्व संशयीत आरोपी फरार आहेत. या घटनेची नोंद पांगरी पोलीस स्टेशन येथे झाली असून पांगरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.