बार्शी -बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वरित द्वितीय वैद्यकीय अधिकारी पद भरावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल भड यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.शासन निर्णयानुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये प्रत्येकी दोन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर करण्यात आली आहेत.सोलापूर जिल्यामध्ये एकुण ७७ प्रा.आ. केंद्र आहेत, त्या पैकी ७६ केंद्रामध्ये प्रत्येकी दोन पदे मंजुर आहेत पण गौडगांव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकच पद मंजूर आहे.गौडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १८ गावे येतात सारोळा, कासारी, भालगाव, आळजापूर, मिर्झनपूर, रुई, संगमनेर, रऊळगांव, आंबेगाव, भांडेगाव, झरेगांव, निंबळक, हत्तीज, मुंगशी, चिंचकोपण, मालेगाव, अंबाबाईचीवाडी, जोतिबाचीवाडी इत्यादी येतात.
गौडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पद भरण्याची मागणी
गौडगाव मध्ये सोमवारी आठवडे बाजार असतो यादिवशी रुग्णांची संख्या साधारण २०० ते २५० च्या आसपास असते व इतर दिवशी १५० ते २०० इतकी असते या संख्येत सतत वाढ होत आहे.लोकसंख्येच्या तुलनेने या आरोग्य केंद्रात सध्या कार्यरत असलेले एकच वैद्यकीय अधिकारी रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकत नाहीत, वैद्यकीय अधिकारी एखाद्या दिवशी रजेवर, मिटींगला, बाह्यरुग्ण तपासण्यासाठी, अंगणवाडी व इतर तपासण्यासाठी गेल्यास रुग्णांचे हाल होतात. यासह गौडगाव हे गांव मराठवाड्याच्या सीमेलगत असल्याने उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यातील रुग्णांही याच आरोग्य केंद्रात येतात.शिक्षण, व्यापार, शासकीय कार्यालय, बँका, आदी कारणामुळे गौडगांव या गावात येणाऱ्यांची संख्याही फार मोठी आहे, या आरोग्य केंद्रात द्वितीय वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा या मागणीसाठी उपोषणे, तालुका व जिल्हा लोकशाही दिना मध्ये तसेच तत्कालीन आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री यांनाही निवेदन देऊन मागणी केली होती.गेले आठ ते नव वर्ष झाले, आम्ही सतत मागणी करत आहोत. परंतु अजून पर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.तरी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून गौडगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये द्वितीय वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.