कुतूहल न्यूज नेटवर्क
मंगळवेढा येथील संजय आवताडे यांच्या घरातील चोरीची उकल, 35 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सोलापूर: सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी, मंगळवेढा येथील संजय आवताडे यांच्या घरातील चोरीची उकल एक आरोपी जेरबंद, 859 ग्रॅम वजनाचे सोन्याची दागिने, चांदीचे पैंजण असा एकूण 35 लाख 26 हजार 160 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.
दिनांक 10 जानेवारी रोजी संजय महादेव आवताडे रा. खंडोबा गल्ली मंगळवेढा यांच्या नविन घराची वास्तूशांतीचे कार्यक्रम असल्याने विनायक माधवराव यादव ( वय 41 वर्षे ), रा. मारापूर ता. मंगळवेढा हे सहकुटुंब आले होते. त्याच दिवशी आवताडे यांचे घरी, तामदर्डी ता. मंगळवेढा येथील रंगसिध्द देवाची पालखी आली होती. विनायक यादव व त्यांचे नातेवाईक हे कार्यक्रमाकरीता आल्यानंतर नवीन घराच्या पहिल्या मजल्यावर थांबले होते.
सदर वास्तूशांतीच्या कार्यक्रमाकरीता आलेले नातेवाईक व घरातील लोक हाॅलमध्ये जमले होते. दुपारी 12ः00 वा. च्या दरम्यान रंगसिध्द देवाची आरती चालु झाल्याने, आरतीसाठी विनायक यादव व इतर नातेवाईक घाईगडबडीने सोबत आणलेली बॅग व इतर साहित्य आहे त्या परिस्थितीत सोडून खालच्या हाॅलमध्ये आरतीसाठी गेले. आरती झाल्यानंतर यादव हे त्यांचे पाहुण्यारावळ्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर, जेवण करून पहिल्यामजल्यावर आले असता, त्यावेळी त्यांनी आणलेल्या बॅगेची चैन उघडी दिसली, बॅग चेक केली असता, बॅगेतील सोन्याचे दागिने असलेले पाउच दिसून आले नाही. त्यांनी सदर पाउच हे संपूर्ण बॅगेत व रूममध्ये शोधले ते सापडले नाहीे. सदरचे पाउच हे चोरीस गेले असल्याची त्यांची खात्री झाली, तसेच त्यांचे नातेवाईक संजय महादेव आवताडे यांनी त्यांचेही काही सोने चोरीस गेले असल्याचे समजले म्हणून विनायक यादव यांच्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याची उकल होण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि रवींद्र मांजरे व त्यांचे पथक आरोपीच्या मागावर होते. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याच्या घटनास्थळी ग्रामीण स्थानिक गुन्हेच्या पथकाने भेट देवून सदर ठिकाणचे व्हिडिओ शुटिंग व सी.सी.टी.व्ही. कॅमेरा याची तपासणी केली. त्यावरून एक अनोळखी संशयित इसम हा त्यादिवशी घरामध्ये वावरत असल्याचे दिसले, सदर इसमाने घातलेले कपडे, उजव्याहातातील दोऱ्याचा गोफ, डाव्या हातातील घड्याळ, केसाचा मश्रूम कट, शरिरयष्टी इ. माहिती घेतली असता, सदरचा इसम हा गोणेवाडी ता. मंगळवेढा येथीलच राहणारा असून तो सध्या दुर्गा माता नगर मंगळवेढा येथील पवार यांचे घरात भाड्याने राहवयास असल्याचे समजले.
सदरचा इसम हा मंगळवेढा येथील दामाजी चौकात थांबला असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाली. दामाजी चौकात जावून त्यास ताब्यात घेतले. त्यास प्राप्त सी.सी.टी.व्ही. फूटेज व व्हिडिओ रेकाॅडिंग दाखविले असता त्यातील इसम मीच असल्याचे त्याने सांगितले. त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषगाने विचारपूस करता त्याने सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला, त्यावरून त्याचा संशय आल्याने त्यास अधिक विश्वासात घेवून त्याचेकडे कौशल्यपूर्ण अथक तपास केला असता, त्याने सांगितले की, वास्तूशांतीच्या दिवशी त्यांचे घरी जावून पालखीचे व सत्यनारायणाचे दर्षन घेवून, पहिल्या मजल्यावरील बेडरूम मध्ये गेलो होतो, तेथे असलेल्या बॅगेतून सोन्याचे दागिने असलेले पाउच व पैशाची पर्स चोरी केल्याचे सांगितले. चोरलेले सोन्याचे दागिने व पैसे गोणेवाडी ता. मंगळवेढा येथे जावून शेतातील बांधावर खड्डे करून पुरून ठेवल्याचे सांगितले. त्याने गोणेवाडी ता. मंगळवेढा येथील शेतातील बांधावर पुरून ठेवलेले दागिने व पैसे काढून दिले. त्याचेकडून सोन्याचे नेकलेस, पोहे हार, गंठन, बाजूबंद, पाटल्या, बांगडया, कडा, अंगठ्या, कानातील लटकन, टाॅप्स, झालर, कानातील बाळी, नथ, सोन्याचे बिस्कीट इ. असा एकूण 859 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजन व रोख रक्कम 10 हजार 160 रू असा एकूण 35 लाख 26 हजार 160 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीस पुढील कारवाईकरीता मंगळवेढा पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुंजवटे मंगळवेढा पोलीस ठाणे हे करीत आहे. सदर आरोपी हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरूध्द मुंबई येथे चोरीचा गुन्हा दाखल असून तसेच मंगळवेढा पोलीस ठाणे येथे वाळू चोरीचे व दारू बंदी कायद्याखाली गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी साततपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर, पोलीस हवालदार/ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार/ धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख तसेच मंगळवेढा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक गुंजवटे व त्यांचा कर्मचाऱ्यांनी बजावली आहे.