कुतूहल न्यूज नेटवर्क
मोडनिंबच्या युवकाच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप ; बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा
बार्शी : तू आमचे वराह (डुक्कर) का मारले तसेच पूर्ववैमनस्याचा राग मनात ठेवून मोडनिंब (ता. माढा) येथील युवकाचा खून केल्याप्रकरणी मोडनिंब येथील दोघा जणांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा बार्शी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. बी. भस्मे यांनी ठोठावली. या निकालानंतर “न्यायालयाने न्याय दिला’, अशा भावना युवकाच्या पत्नीने व्यक्त केल्या.
गणेश सोनबा धोत्रे (वय २५), दीपक सुनील धोत्रे (वय२६, दोघे रा. मोडनिंब) अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. विकास धोत्रे या युवकाचा खून झाला होता. विनोद धोत्रे यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात 15 सप्टेंबर 2017 रोजी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा केला.
दिनांक १५ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी १२ वाजता मोडनिंब येथील श्रीपाद माऊली मठामध्ये गणेश धोत्रे यांनी मयत विकास धोत्रे यांच्या डोक्यात दगड मारला व दिपक धोत्रे यांनी त्याच्या हातातील चाकूने मयताचा गळा चिरुन खून केला होता. सदर घटना ही आरोपी व मयत यांच्या दरम्यान डुकराचे पिल्लू मारण्याचे कारणावरुन पुर्वीपासून वैमनस्याचा राग मनात धरुन आरोपीनी मयत विकास धोत्रे यांचा खून केला होता.
यात सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात सरकार पक्षाचे वतीने ॲड. दिनेश देशमुख यांनी युक्तीवाद केला की, सरकार पक्षाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी सदर घटना पाहिली आहे. तसेच सदर आरोपीनी घटनेच्या वेळेसचे वापरलेले कपडे व त्यावरील रक्ताचे डाग तसेच आरोपीनी गुन्हा करणेस वापरलेली हत्यारे व मयताच्या अंगावरील जखमा ह्या पोस्टमार्टम रिपोटमध्ये नमूद जखमा व साक्षीदाराने सांगितलेल्या जखमा ह्या एकमेकांशी सुसंगत आहेत तसेच ज्या हत्याराने मारले आहे सदर हत्यार व मयताचे अंगावरील जखमा ह्या आरोपीने गुन्ह्याचे वेळेस वापरलेले हत्याराने होतात अशी साक्ष डॉक्टर यांनी दिली.
आरोपीने सदर प्रकरण चालविताना घेतलेला बचाव हा सरकार पक्षाने खोडून काढला व आरोपीने केलेला गुन्हा हा सरकार पक्षाने शाबीत केलेला आहे. असा युक्तीवाद ॲङ. दिनेश देशमुख यांनी केला सर्व साक्षीदार व आरोपीविरुध्द असलेला पुराव्याचा विचार करता बार्शी येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. ब. भस्मे यांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
सरकार पक्षा तर्फे ॲङ दिनेश देशमुख यांनी काम पाहिले. सदर प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी तसेच तपास अधिकारी म्हणून टेंभूर्णी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरिक्षक आनंद खोबरे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून अमृत खेडकर यांनी काम पाहिले.