बार्शी : देशातील कोरोना कालावधीच्या लॉकडाऊन पासून, मागील एक वर्षापासून बंद असलेली बार्शी टेक्सटाईल मिल ३१ मार्च २०२१ पासून सुरु होणार आहे. त्यामुळे, गेल्या वर्षभरापासून बंद असलेला मिलचा भोंगा वाजणार आहे. दरम्यान, मिल सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना व आदेश शुक्रवार दि.१२ मार्च २०२१ रोजी प्राप्त झाला आहे.
बार्शी टेक्स्टाईल मिलचा ‘भोंगा’ लवकरच वाजणार
संपूर्ण देशातील लॉकडाउनच्या प्रक्रियेनंतर काही काळाने अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली होती. या अनलॉकच्या प्रक्रियेपासून राष्ट्रीय गिरणी कामगार संघ, बार्शी यांनी धावपळ केली. त्यानंतर, आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोपल यांनी संबंधित खात्यांशी पत्रव्यवहार केला होता. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला. तर, प्रत्येक बार्शीकरांच्या मनातून भगवंताला साकडंही घातलं गेलं. आज या पाठपुराव्याला, बार्शीकरांच्या प्रार्थनेला यश आले असून ४५० कामगारांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला आहे.