चिंचवड प्रतिनिधी (दयानंद गौडगांव): पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे रूग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. महापालिकेची वायसीएम रुग्णालय देखील फुल्ल झाली आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात पत्र्याचे शेड टाकून वॉर्ड तयार केला असून तिथे रुग्णांना ऑक्सिजन देण्याची वेळ आली आहे. दिवसाला दोन हजारहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. वायसीएम, पिंपरीतील नवीन जिजामाता, भोसरीतील नवीन रुग्णालय, भोसरीतील बालनगरी कोविड केअर सेंटर, ॲटो क्लस्टर, घरकुल येथील कोविड केअर सेंटर हाऊसफुल्ल झाले आहेत. वायसीएम रुग्णालयात एक आयसीयू वगळता सर्व वॉर्डमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. वायसीएममध्ये जागा नसल्याने बाहेरील बाकड्यावर रुग्णांवर उपचार केले जात आहेत. बाकड्यावरच रुग्णाला ऑक्सिजन द्यावा लागत आहे. त्यामुळे बेडची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील कोरोना रुग्णांवर उपचार होण्यासाठी पीएमआरडीएतर्फे पिंपरीतील नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे 816 बेडचे अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना ऑक्सीजन, आयसीयू बेडची आवश्यकता भासणार असून जम्बो कोविड सेंटरमधील 200 बेड कार्यान्वित करण्याचे वैद्यकीय विभागाचे नियोजन आहे.