बार्शी : पाथरी (ता. बार्शी) येथील सेवानिवृत्त शिक्षकाचे घर भर दिवसा फोडून 23 तोळे सोन्याचे दागिने व रोख 15 हजार रुपये असा 10 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सेवानिवृत्त शिक्षक सर्जेराव वैजिनाथ पाटील (वय 72, रा. पाथरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना गुरुवारी (ता. 1 एप्रिल) दुपारी साडेअकरा ते दीडच्या दरम्यान घडली.
सर्जेराव पाटील हे गुरुवारी बार्शी येथे वीज वितरण कार्यालयात लाईट बिल भरण्यासाठी गेले होते. तर त्यांची पत्नी सिंधू पाटील (वय 65) या गावातील प्रकाश गायकवाड यांच्याकडे कार्यक्रम असल्याने साडेअकरा वाजता घराला कुलूप लावून शेजारच्या पिठाच्या गिरणीमध्ये चावी ठेवून गेल्या होत्या.
दुपारी दीडच्या दरम्यान सर्जेराव पाटील पाथरी येथे घरी आले असता घराचे दरवाजे उघडे दिसले. त्यांनी पत्नीला हाक मारली पण प्रतिसाद मिळाला नाही. घरात आत येऊन पाहताच दोन रूमचे कुलूप तोडल्याचे व कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटातील दहा तोळ्याच्या चार पाटल्या, पाच तोळ्यांचे दोन गंठण, दीड तोळ्याची बोरमाळ, पाच ग्रॅमची ठुशी, एक तोळ्याच्या अंगठ्या व कर्णफुले, रोख रुपये 15 हजार असा 10 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
चोरीची माहिती समजताच करमाळा विभागाचे पोलिस उपअधीक्षक हिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.