कुतूहल न्यूज नेटवर्क
पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना परिक्षा विना थेट पुढच्या वर्गात प्रवेश ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
पुणे (दयानंद गौडगांव ): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत च्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री गायकवाड यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली. मंत्री गायकवाड म्हणाल्या, इयत्ता पहिली ते आठवीच्या वार्षिक मुल्यमापन संदर्भात मी बोलणार आहे. मधल्या काळात ऑनलाईन, ऑफलाईन, यूट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं. कोरोनाची परिस्थिती पाहता आणि वार्षिक मुल्यमापनाबाबत निर्णय घेत असताना, आम्ही शालेय शिक्षण माध्यमाद्वारे असा निर्णय घेत आहोत की, पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत, आरटीईच्या अंतर्गत म्हणजे मोफत शिक्षण अधिकाराच्या कायद्यांतर्गत, खरंतर या मुलांचं वर्षभराचं मुल्यमापन बघितलं पाहिजे. परंतु यंदाची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यामुळे यंदा हे होणं शक्य नाही. म्हणून आज आम्ही शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून असा निर्णय घेत आहोत की, राज्यातील जे पहिली ते आठवी इयत्तेमधील विद्यार्थी आहेत, शिक्षण हक्क अधिकाऱाच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढील इयत्तेत पाठवण्यात येत आहे. असं शिक्षणमंत्री गायकवाड यांनी जाहीर केले.