कुतूहल न्यूज नेटवर्क
राज्यातील डिजिटल मिडियातील संपादक व पत्रकारांना संचारबंदी निर्बंध नियमातून वगळा- राजा माने
राज्यातील डिजिटल मिडियातील संपादक व पत्रकारांना संचारबंदी निर्बंध नियमातून वगळून संरक्षण देण्याची मागणी जेष्ठ पत्रकार तथा डिजिटल मिडियातील संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, डिजिटल मिडियाचा प्रसार गाव पातळीपर्यंत पोहोचला आहे, हे आपण जाणताच. कोविड महामारी संकट काळात महाराष्ट्र शासनाच्या कार्यास पूरक असे काम डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र करीत आहे. राज्यात प्रशासन आणि जनता यांच्यातील विधायक व सकारात्मक संवादातील महत्त्वाचा दुवा म्हणून न्यूज पोर्टल्स, न्यूज यूट्यूब चॅनल्स, न्यूज वेबसाईटस् आणि विविध ऑनलाइन आवृत्त्यांचे संपादक, वार्ताहर, फोटो व व्हिडीओ ग्राफर्स करीत आहेत.
कोविड महामारीची साखळी तोडण्यासाठी आपण राज्यात जाहीर केलेल्या संचारबंदीचे आम्ही स्वागत करतो. या कालावधीत आपण केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच संचारबंदी निर्बंधमुक्त केले. डिजिटल मिडिया अधिस्वीकृती संदर्भात केंद्र व राज्य शासनाने अद्याप कुठलीही यंत्रणा अथवा मान्यता पध्दती विकसित केलेली नाही. त्यामुळे संचारबंदी काळात डिजिटल मिडियात कर्तव्य बजावणाऱ्यांची गैरसोय होईल. तरी कृपया, राज्यातील डिजिटल मिडियातील संपादक आणि सर्व पत्रकारिता घटकांना संचारबंदी निर्बंधातून सूट द्यावी व तशा सूचना गावपातळीवर निर्गमित कराव्या असे या निवेदनात म्हटले आहे.