fbpx

सुप्रिया सुळेंची पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी रुग्णालयाच्या गेट बाहेरून जोरदार बॅटिंग!

कुतूहल न्यूज नेटवर्क

मुंबई :- पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भगीरथ भारत भालके हे राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवत आहेत. आज निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या ब्रिच कँडी रुग्णालयातून व्हर्चुअली पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघात सभेसाठी हजर होत्या. ज्याप्रकारे शरद पवार हे स्वतःला झोकून देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, त्याच संघर्षमय वृत्तीचे चित्र आज सुप्रिया सुळे यांच्यात पाहायला मिळाले.

आपल्या भाषणात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भालके नाना यांच्यासोबत आम्ही ठरवलं होतं की पंढरपूरचा चेहरामोहरा बदलला पाहिजे. पंढरपूर स्वच्छ, सुंदर आणि सुशोभीत कसं करता येईल याचा विचार आम्ही करत होतो. त्यामुळे पंढरपूर, भालके नाना आणि मी असं आमचं एक वेगळंच नातं होतं. मात्र नाना अर्धवट साथ सोडतील असं वाटलं नव्हतं. त्यामुळे खूप विश्वासाच्या नात्याने भगीरथ भालके यांना ही जबाबदारी दिली आहे. आपण भालके नानांना श्रद्धांजली देण्यासाठी जमलो आहोत. त्यामुळे आपण नानांची अर्धवट राहिलेली स्वप्नं आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास पूर्ण करण्यासाठी भगीरथ भालके यांना घड्याळाच्या बाजूचं बटण दाबून जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत राज्यात सध्या लागू केलेल्या कडक निर्बंधाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार हे जनतेच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. या कोरोना महामारीच्या काळात पुन्हा लॉकडाऊन करतानाही समाजातील प्रत्येक घटकावर अन्याय होणार नाही याची काळजी या सरकारने घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन करून शासनाला सहकार्य करूया असे आवाहन सुळे यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *