कुतूहल न्यूज नेटवर्क
मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिका प्रभावी उपाययोजना करीत असून पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने 995 इमारती संपूर्ण इमारती तर 10 हजार 859 मजले-इमारतीचे भाग सील करण्यात आले आहेत. शिवाय झोपडपट्टय़ा-चाळींमध्येही 90 कंटेनमेंट झोन आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबईत सद्यस्थितीत तब्बल 21 लाख मुंबईकर नियमांच्या कचाट्यात सापडले आहेत.
झपाट्याने वाढणारा कोरोना रोखण्यासाठी पालिका नियमांच्या कठोर अंमलबजावणीला प्राधान्य देऊन काम करीत आहे. यामध्ये बाधित रुग्णांच्या माध्यमातून होणारा प्रसार रोखण्यासाठी 2 रुग्ण आढळल्यास इमारतीचा मजला तर 5 रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येत आहे. पाच रुग्ण आढळल्यावर पालिका पूर्ण इमारत प्रतिबंधित करत आहे. मात्र यात बहुमजली आणि जास्त विंग असलेल्या इमारतींबाबत स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत जेणेकरून इतर रहिवाशांना या नियमांचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, ग्रॅण्ट रोड, मलबार हिल या डी प्रभागात 2 एप्रिलपासून आतापर्यंत प्रतिबंधित इमारतींची संख्या तब्बल 108 ने वाढली आहे. 2 एप्रिल रोजी या प्रभागात 79 प्रतिबंधित इमारती होत्या, तर आता ही संख्या 187 वर पोहचली आहे. तर के पश्चिम प्रभागात ही संख्या 77 ने वाढली असून एफ दक्षिण प्रभागात 37 ने वाढली आहे.
- मुंबईत झोपडपट्टी-चाळींमध्ये 90 कंटेन्मेंट झोन आहेत. यामध्ये 85 हजार घरांमधील 3.85 लाख रहिवासी प्रतिबंधात आहेत.
- 995 संपूर्ण इमारती सील असून 1 लाख 33 घरांमधील 4 लाख 90 हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत.
- झोपडपट्टी-चाळींमधील 10 हजार 859 मजले सील असून 3 लाख 2 हजार घरांमधील तब्बल 13 लाख 8 हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत.
कांदिवली, अंधेरी, भायखळामधील कंटेन्मेंट झोन अधिक
झोपडपट्टी-चाळींमधील कंटेन्मेंट झोनमध्ये कांदिवली, अंधेरी पूर्व आणि भायखळा येथे सर्वाधिक कंटेन्मेंट झोन आहेत. यामध्ये अनुक्रमे 20 आणि 13, 13 कंटेन्मेंट झोन आहेत. तर दहिसर, कुर्ल्यामध्ये प्रत्येकी 7 आणि भांडुपमध्ये 6 कंटेन्मेंट झोन आहेत.