मुंबई: इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील सातवा सामना गुरुवारी (१५ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ३ विकेट्सने विजय मिळवला आहे. दिल्लीने राजस्थानला १४८ धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानने हे आव्हान २ चेंडू बाकी ठेवत ७ विकेट्सच्या मोबदल्यात यशस्वी पूर्ण केले. राजस्थानच्या या विजयात डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिसने मोलाचा वाटा उचलला.
राजस्थानने १० षटकांच्या आतच ५ विकेट्स गमावल्यानंतर डेव्हिड मिलर आणि राहुल तेवातियाने राजस्थानचा डाव सावरला. त्यांनी ४८ धावांची भागीदारी केली. त्यामुळे राजस्थानने सामन्यात पुनरागमन केले. पण ही भागीदारी रंगत असतानाच तेवतियाला कागिसो रबाडाने १९ धावांवर बाद केले. त्यानंतर अर्धशतक केल्यानंतर काहीवेळात मिलरला आवेश खानने बाद केले. मिलरने ४३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६२ धावांची खेळी केली. त्याच्या या अर्धशतकामुळे राजस्थानच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
त्याच्यानंतर ख्रिस मॉरिसने आक्रमक खेळत १८ चेंडूत ४ षटकारांसह नाबाद ३६ धावांची खेळी करत अखेर राजस्थानला विजय मिळवून दिला. मॉरिसला जयदेव उनाडकटने १ षटकारासह नाबाद ११ धावा करत चांगली साथ दिली.