fbpx

बार्शीच्या आमदारांची कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत बैठक

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी:  सध्या बार्शी शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, वैद्यकीय आरोग्य सेवा-सुविधा देणाऱ्या डॉक्टरांशी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी नगरपरिषदेत तातडीची बैठक बोलावून संवाद साधला.

या बैठकीत आमदार राजेंद्र राऊत यांनी, सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करीत असताना ऑक्सीजनचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा इत्यादी बाबींबाबत चर्चा केली. तसेच, त्या सोडविण्यासाठी मी शासन स्तरावर दिवस-रात्र एक करून प्रयत्न करीत असल्याचे सांगून, आपण सर्व डॉक्टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचेही सांगितले. आपण सर्वजण आपल्या सहकाऱ्यांसोबत रुग्णांना आरोग्य सोयी-सुविधा देत आहात व रुग्णांचे प्राण वाचवित आहात, या योगदानाबद्दल मी आपल्या सर्वांचा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ऋणी आहे. आपल्या सेवेमुळे तालुक्याचे नाव उंचावत असल्याचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत त्यांनी सर्व डॉक्टरांच्या सेवेचे कौतुक करून, त्यांना धीर देऊन, उपचारा दरम्यान येत असलेल्या अडी-अडचणींवर यशस्वीपणे मात करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे अभिवचन दिले. तर, आरोग्य सेवा देत असताना येणाऱ्या अडी-अडचणी संदर्भात चर्चा करताना प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याशी सर्वांचे फोनवरून बोलणे करून दिले.

या बैठकीस तहसीलदार सुनील शेरखाने, नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, जगदाळे मामा हॉस्पिटलचे डॉ.आर.व्ही. जगताप, कॅन्सर हॉस्पिटलचे किशोर परांजपे, डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल सेंटरचे डॉ. अजित अंधारे, डॉ. योगेश सोमाणी, डॉ. रोहन पाटील, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. विक्रांत शहा, डॉ. गणेशकुमार सातपुते, डॉ. योगेश कुलकर्णी, नंदकिशोर शुक्ला, अजित कुंकूलोळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *