कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: पुरी (ता.बार्शी) शिवारात मध्यरात्री नांगरणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकासह शेतमालकास धोतराने हातपाय बांधून ट्रॅक्टर, मोबाईल हॅण्डसेट असा सहा लाख साठ हजाराचा ऐवज लंपास केल्याप्रकरणातील वाशी (जि.उस्मानाबाद) तालुक्यातील एका संशयितास रात्रगस्तीदरम्यान शिराळे फाट्यावर अटक करण्यात पांगरी पोलिसांना यश आले आहे.
शंकर शिवाजी काळे, रा. पारधी वस्ती तेरखेडा जि.उस्मानाबाद अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. पांगरी पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर तोरडमल, पांडुरंग मुंढे, मनोज जाधव, कुनाल पाटील, अर्जुन कापसे, तानाजी डाके, सुनील बोधमवाड, काकडे, भंडरवाड, धस हे रात्र गस्त घालताना त्यांना काळे हा संशयितरित्या फिरताना मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यास पोलीस ठाण्यात आणुन त्याच्याकडे विश्वासाने चौकशी केला असता त्याने व त्याचे ईतर साथीदार यांनी मिळून सदरचा गुन्हा केला असल्याचे त्याने कबूल केले आहे. त्याला आज बार्शी न्यायालयात उभे केले असता त्यास 28 एप्रिल पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रकमधून आलेल्या आठ ते दहा चोरट्यांनी पुरी शिवारातील ट्रॅक्टर चालकास व शेतीच्या मालकालाही बेदम मारहाण करून त्यांच्या अंगातीलच धोतर फाडुन तोंडात बोळे घालुन ट्रॅक्टर पळवुन नेला होता. ट्रॅक्टरचे चालक जयसिंग पवार (वय32) व भागवत दिडवळ (वय 60) दोघेही रा. पुरी ता.बार्शी हे चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झाले होते. जखमी जयसिंग पवार यांनी पांगरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोरट्यांनी सहा लाख रुपयाचा ट्रॅक्टर, पन्नास हजार रुपयाचा लोखंडी नांगर व एक दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल हँडसेट असा 6 लाख 60 हजारांचा ऐवज पळून नेला होता.अधिक तपास सपोनी सुधीर तोरडमल करत आहेत.