fbpx

कोरोनाबाधित वृद्धाचा पोलिसांनी उरकला अंत्यविधी

कुतूहल न्यूज नेटवर्क

पंढरपूर : सांगवी ता.पंढरपुर येथील एका कुटुंबातील अनेक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याने ते पंढरपूर येथे उपचार घेत असताना त्यांच्या घरी विलगिकरणात असलेल्या ६० वर्षाच्या  एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या घरातील इतर सर्व व्यक्ती पॉझिटिव असल्याने त्यांचे अंत्यविधी करिता गावातील कोणी पुढे येत नसल्याने चक्क करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना मदतीला घेऊन अंत्यविधी पार पाडला.

करकंब पोलिस ठाण्याचे सपोनि प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या २६ गावात भेटी देऊन त्या त्या गावातील प्रमुख व्यक्तीशी संपर्क ठेऊन कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

सांगवी गावात आतापर्यंत १७ व्यक्तीला कोरोना ची लागण झालेली होती. सध्या पाच व्यक्ती पंढरपूर येथे उपचार घेत आहेत तर  एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीचा शेतातील घरीच विलगिकरणात असताना दुर्दैवी मृत्यू झाला होता.

सदर मयताच्या कुटुंबातील इतर लोकांनाही कोरोना झाला असल्यामुळे अंत्यविधीला गावकरी जाण्यास धजत नव्हते. त्यांचा मुलगाही उपस्थित राहू शकत नव्हता. त्यामुळे त्यांचे जवळचे नातेवाईक सुन व जावई यांचे उपस्थितीत पोलिसांनी कोविड चे नियम पाळत अंत्यविधी करण्यास मदत करून मृतास अग्नी दिला व समाजाला आदर्श निर्माण करूण दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *