कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणार १०० बेडचे कोविड केअर सेंटर; चेअरमन रणवीर राऊत
बार्शी : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने १०० बेडचे कोवीड केअर सेंटर उभारण्यात येणार असुन त्यासाठी संचालकांची तातडीची बैठक ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती चेअरमन रणवीर राऊत (Ranveer Raut) यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे उपस्थित होते.(Barshi Agricultural Produce Market Committee to set up 100-bed Covid Care Center)
कृषि उत्पन्न बाजार समिती,बार्शी चे कार्यक्षेत्र हे संपूर्ण बार्शी तालुका हे आहे. बार्शी तालुक्यात सध्या कोरोना (कोव्हीड-१९) या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सदर विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. तरी देखील सदर उपाय योजना अपुऱ्या पडत आहेत. बार्शी शहर व तालुक्यात दररोज किमान ५ ते १० रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. तसेच बार्शी शहर व तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी बार्शीमध्ये येत असलेमुळे बार्शी शहरात व ग्रामीण भागात रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, औषधे व इंजेक्शन इत्यादी सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने अनेक लोकांना जीव गमवावा लागत आहे. अशा गंभीर परिस्थितीत राज्य शासनाच्या आवाहनानुसार कोरोना (कोव्हीड-१९) या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेसाठी, रुग्णांना तातडीने उपचार मिळावा या उद्देशाने व आवश्यक त्या सोयी मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतला आहे.
बार्शी बाजार समितीचे फळे भाजीपाला विभागातील सेल हॉल स्व:ताच्या मालकीचे दहा हजार चौ.फुट इतक्या क्षेत्रफळाचे आहे. फळे व भाजीपाला मार्केट सध्या बंद आहे. सदर जागेत १०० बेडचे कोव्हिड सेंटर उभारणेची क्षमता असल्याने सदर ठिकाणी कोव्हिड सेंटर सुरु करता येईल. सदर ठिकाणी कोव्हिड सेंटर सुरु केल्यास बार्शी शहरातील व तालुक्यातील शेतकरी, गरीब रुग्ण, हमाल, तोलार, श्रमिक कामगार यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. बाजार समितीच्या वतीने कोव्हिड सेंटर सुरु करणेसाठी १०० बेड, १०० गाद्या, २००
बेडशीट, २०० उशीखोळ, २०० चादरी व कोव्हिड सेंटरसाठी लागणारे इतर साहित्य खरेदी करावे लागणार आहे. तसेच सदरचे कोव्हिड सेंटर सुरु केल्यानंतर सदर ठिकाणची साफ सफाई करणेसाठी सफाई कामगार तसेच साफसफाईसाठी लागणारे साहित्य व सॅनिटायझेशनसाठी सॅनिटायझर, हॅन्डवॉश, फिनेल, ॲसीड, मास्क, पल्स ऑक्सिमीटर, थर्मा मीटर, सोडियम हायपोक्लोराईड तसेच कोव्हिड सेंटरच्या अनुषंगाने लागणारे इतर साहित्य खरेदी करावे लागणारआहे. तसेच सदर कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती होणाऱ्या रुग्णासाठी, औषधे, पाणी, चहा, नाष्टा, जेवण व इतर अनुषंगिक आवश्यक त्या सुविधा कराव्या लागतील. तसेच सदर ठिकाणी बाजार समितीची १५ शौचालये आहेत.
तरी बाजार समितीच्या वतीने बाजार समितीच्या फळे भाजीपाला मार्केट येथे कोव्हिड सेंटर सुरु करणेसाठी बाजार समितीने दि.३० एप्रिल रोजी बाजार समितीमध्ये संचालक मंडळाची तातडीची सभा बोलविलेली आहे. सभेमध्ये कोव्हीड सेंटर उभारणीच्या विषयास मंजूरी घेवून कोव्हीड सेंटर उभारणीच्या खर्चाच्या मंजूरीचा प्रस्ताव गा.जिल्हा उपनिबंधक सह संस्था, सोलापूर यांचे मार्फत पणन संचालक, पणन संचालनालय पुणे व महाराष्ट्र शासनाकडे पाठविणेत येणार आहे व मंजूरी नंतर कोव्हीड सेंटरची उभारणी केली जाणार आहे. अशी माहिती सभापती रणवीर राऊत यांनी दिली.