कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्रेक झाला आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारादरम्यान प्लाझ्माची मागणी वाढली आहे. कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत आहे. अशा स्थितीत गंभीर रुग्णांवर उपचारांसाठी “प्लाझ्मा थेरपी’ कडे एक आशेचा किरण म्हणून पाहिलं जात आहे. परंतु प्लाझ्मा थेरेपीच्या उपचारासाठी सुमारे आठ हजारापर्यंत खर्च येत असल्याने सर्वसामान्यांना ही न परवडणारी होत असल्याचे लक्षात येतात आमदार राजेंद्र राउत यांच्या सूचनेनुसार बार्शीतील भगवंत रक्तपेढीने गरजूंसाठी मोफत प्लाझ्मा देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबवत असल्याची माहिती चेअरमन शशिकांत जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, आरोग्य सभापती संदेश काकडे, संदिप बरडे, सुधीर राऊत, शकील मुलाणी, अश्फाक काझी, गणेश जगदाळे, मुकुंद यादव आदी उपस्थित होते.
Plasma: बार्शीतील भगवंत रक्तपेढी रुग्णांना देणार मोफत प्लाझ्मा
जगदाळे म्हणाले, राजाभाउ राऊत हे भगवंत ब्लड बँकेच्या स्थापनेपासून मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून वेळोवेळी विधायक उपक्रम राबविण्यात आले आहेत. आज पहिल्याच दिवशी दोन दात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला त्यापैकी सलीम जिकरे यांची चाचणीद्वारे पात्रता झाल्यानंतर त्यांचे प्लाझ्मा स्विकारण्यात आले आहे. मागील वर्षीही सर्वच रुग्णांना निम्म्या किमतीन रक्तपुरवठा, मुंबईच्या महापौर यांच्या माध्यमातून २५० रक्तपिशव्यांचा मोफत पुरवठा करण्यात आला. रुग्णांना सध्या कोविड प्लाझ्माची आवश्यकता आहे, अनेकजण आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच अनेकांचे रोजगारही गेले आहेत. बेकारीच्या संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मोफत कोविड प्लाझ्मा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रावसाहेब मनगिरे म्हणाले, भगवंत रक्तपेढीने यापुर्वीही कर्मवीर ज्येष्ठ नागरिक योजनेद्वारे अर्ध्या किमतीत रक्ताची उपलब्धता, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मोफत रक्त पुरवठा, मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, बिनविरोध ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांना मोफत रक्त, रक्तदात्यांना मोफत, आजीवन रक्त पुरवठा, मुंबईतील कोरोनाचे भीषण संकट लक्षात घेत मोफत रक्तपुरवठा असे अनेक उपक्रम सातत्याने राबविलेले आहेत. सध्याच्या कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रक्तपेढीवर अधिकचा आर्थिक भार पडणार आहे, परंतु सध्याची गरज लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.
भगवंत रक्तपेढीचे चेअरमन शशिकांत जगदाळे व त्यांचे सहकारी मागील सहा वर्षांपासून अत्यंत चांगल्या उपक्रमांचे आयोजन करत आहेत. ज्या रुग्णांना प्लाझ्माची आवश्यकता आहे, अशा कोरोना रुग्णांसाठी रक्तपेढीने मोफत प्लाझ्मा देण्याचा अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे.– राजेंद्र राऊत, आमदार बार्शी.