बार्शी: आज गौडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे परिचारिका दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्य करणाऱ्या सर्व परिचारिका यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन आंबेगावाचे सरपंच सुशिलकुमार दळवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरवर्षी १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. हा दिवस म्हणजे आद्य परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म दिन. इंग्रज परिचारिका व आधुनिक रुग्णपरिचर्या (Nursing) शास्त्राच्या संस्थापिका. त्यांनी सार्वजनिक आरोग्यविज्ञानात मोलाची भर घातली. संपूर्ण जगाला त्यांनी सेवेचा पायंडा घालून दिला. त्यांच्या सेवेला प्रणाम म्हणून ‘लेडी विथ द लॅम्प’ ही उपाधी त्यांना प्रदान करण्यात आली. त्यांच्या खडतर तपश्चर्येमुळे परिचर्या क्षेत्राचा उगम झाला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल भड, वैद्यकीय अधिकारी डॉ. सपाटे, परिचारिका जाधवर, विष्णू, क्षिरसागर, प्रा. आनंद सुरवसे, भास्कर काकडेसह आरोग्य सेविका उपस्थित होत्या.