बार्शी: महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी व गौडगाव (ता. बार्शी) भागात रुग्णांची संख्या जास्त असल्याने येथील पंचायत राज ट्रेनिंग सेंटर मध्ये कोविड सेंटर सुरू केले आहे. सदर सेंटर मध्ये अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहेत आणि डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते या मध्ये भाग घेत आहेत. या सेंटर मधील स्वच्छता करण्यासाठी राहुल भड यांचं सहकार्य कधीही असते. समाजिक कार्य म्हटले की कामाचे क्षेत्र कोणतेही असो राहुल भड तळमळीने, निर्भयपणे काम करत असत.
ते सध्या गौडगाव येथे सहारा वृद्धाश्रम चालवीत आहेत, तसेच त्यांनी बार्शी तालुक्यातील ६० जिल्हा परिषद शाळेमध्ये पुस्तके भेट दिली आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी ते सतत उपोषण, अंदोलनाच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडीत असतात. गेल्या वर्षापासून कोरोनाने ग्रासलेल्या रुग्णांना भेटणे, त्यांना धीर देणे, गरीब वंचित लोक कोणी भुकेवाचून उपाशी राहत असेल तर त्यांना अन्न देणे, अशा विविध पद्धतीने ते सामाजिक काम करत असतात. राहुल भड, आरोग्य सेवक क्षीरसागर के.एन, होमगार्ड दशरथ भोसले यांनी कोविड सेंटर मध्ये स्वच्छता अभियान उपक्रम राबवून समाजाला एक आदर्श घालून दिला आहे.