कुतूहल न्यूज नेटवर्क
झाडी बोरगांवातील ग्रामसुरक्षा दलाने दिले 31 गोवंशास जीवदान
बार्शी : झाडी बोरगांव ता. बार्शी येथील ग्रामसुरक्षा दलाच्या बारा युवकांनी जनावरांची तस्करी करणारी दोन बेकायदा वाहने पकडून वैराग पोलीसांच्या स्वाधीन केली आहेत. ही घटना शनिवारी घडली असून दोघांविरोधात वैराग पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या प्रकरणी सुमारे साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाच आठवड्यात तिसरे वाहन जप्त केल्याने जनावरांची तस्करी गंभीर बाब बनल्याचे समोर आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांवर ताण येत आहे .त्यामुळे काही गावात ग्रामसुरक्षा दलाचे युवक व पोलीस मित्र प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. शनिवार दिनांक १८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजणयाच्या सुमारास बोरगांव येथे ग्रामसुरक्षा दलाचे युवक उभे असताना रस्त्यावरून दोन वाहने वेगात निघाली होती. ग्रामसुरक्षा दलाचे युवकांना याबाबत संशय आल्याने त्यांनी सदर वाहने थांबवली असता एमएच १३ सी.यु. ८२१३ आणि एम एच १३ ए एन ७४६३ या वाहनामध्ये वासरे कोंबून त्यावर कापड टाकून वरती कॅरेट ठेवण्यात आले होते.शेतीमाल वाहतुकीची वाहने असल्याचे भासविण्यात येत होते . या दोन्ही वाहनात दोन मोठ्या गाईसह ३३ जर्सी कालवडी वासरे तोंडाला चिकटपट्ट्या लावलेल्या अवस्थेत मिळून आली. ग्राम सुरक्षा दलाच्या युवकांनी सदरची दोन वाहने वैराग पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली.
यात ग्राम सुरक्षा दलाचे बालाजी लंगोटे, साईनाथ भालेराव, अक्षय चव्हाण, शंकर भोंग, प्रदीप भोंग, राहुल भोंग, प्रकाश भोंग ,प्रदीप लंगोटे, अमोल शिंदे, सुजित बोधले, मारुती चव्हाण ,सुहास भोसले या युवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात नागनाथ विठ्ठल गडेकर वय 27 ( रा. यावली ) व अब्दुला शकुर मुलाणी वय २२ ( रा माढा ) ह्या दोघा वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.