शोध मोहिमेस लवकरच यश येईल आमदार राणा जगजितसिंह पाटील
कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद :आसिफ मुलाणी
काल (दि.९) सायंकाळी झालेल्या पावसामुळे अचानक आलेल्या पुरात समुद्रवाणी व बोरखेडा येथील प्रत्येकी एक व्यक्ती वाहून गेल्याचे वृत्त कळाले. तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथकाचे शोधकार्य सुरू झाले असून या व्यक्तींचा शोध घेत आहेत. लवकरच त्यांच्या मोहिमेस यश येईल अशी अपेक्षा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.
पावसाचा ओघ सुरू असून ग्रामस्थांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. नदी नाले ओलांडण्यापूर्वी पाण्याचा अंदाज घ्यावा व सतर्कता बाळगावी. उस्मानाबाद तालुक्यातील काही भागात काल सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामध्ये शेती व घरांचेदेखील प्रचंड नुकसान झाले आहे. समुद्रवाणी, मेंढा, लासोना, सांगवी, बोरखेडा, कामेगाव, टाकळी, कनगरा, घुगी या भागांमध्ये मोठा पाऊस झाला असून अतिवृष्टीने अनेक ठिकाणच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. नुकतेच पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे.
तहसीलदार गणेश माळी यांना झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करणेबाबत सुचित करण्यात आलेले आहे. जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना देखील या अनुषंगाने सूचना करण्यात आल्या आहेत. लासोना व समुद्रवाणी येथील अनेक घरांमध्ये आताही पाणी आहे. झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून योग्य ती मदत तात्काळ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी समाज माध्यमाद्वारे सांगितले आहे.