कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : वैराग येथील दरोडा, मोक्कातील संशयित आरोपींना शोधण्यासाठी बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे पथक कोरफळे येथे गेले असता एकाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तर एकजण पोलिसांच्या तावडीतून फरार झाला आहे. एकास संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. दोन महिलांसह तिघांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
हवालदार रियाझ शेख यांच्या फिर्यादीवरून कालिंदा राजकुमार काळे (रा . कोरफळे), आशाबाई पंप्या शिंदे (रा. लाडोळे) आनंद्या राजकुमार रामराया काळे (रा. कोरफळे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजता घडली.
सविस्तर वृत्त असे कि, वैराग येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी कोरफळे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस पथक तेथे गेले असता घरासमोर आनंद्या काळे व राजकुमार रामराया काळे बसले होते. पोलिसांना पाहताच आनंद्या काळे याने घरात पाच लिटरने भरलेला पेट्रोलचा कॅन्ड अंगावर ओतून घेऊन हातात काडीपेटीतील काडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी आशाबाई शिंदे, काविंदा काळे यांनी पोलिसांना अडथळा करून गोंधळ केला व आनंद्या काळे यास पळून जाण्यास मदत केली. पोलिसांनी जादा कुमक मागवून राजकुमार काळे यास अटक केली. अधिक तपास पोलिस करीत आहेत.