कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना येणाऱ्या अडचणीची दखल घेऊन मळेगाव येथील श्री शिवाजी तरुण कला व क्रीडा मंडळाच्या वतीने लोकवर्गणीतून जनसेवेसाठी अडीच लाख रुपये गोळा करून खरेदी केलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला.
बाळासाहेब माळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवाजी तरुण मंडळाने गरज ओळखून राबवलेला रुग्णवाहिका लोकार्पण उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून इतरांनीही या मंडळाचा आदर्श घेत सण, उत्सव, समारंभ, वाढदिवस साजरे करताना अनावश्यक खर्च टाळून ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी इतर गावांनीही अशा पद्धतीनेच पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब माळी हे होते. यावेळी सरपंच संजय माळी, उपसरपंच धीरज वाघ, सिद्धेश्वर मुंबरे, माजी सरपंच गुणवंत मुंडे, भाऊसाहेब माने, प्रा. महारुद्र गडसिंग, शिवाजी पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर पटेल, भगवान बुद्रुक, अजीम बागवान, दशरथ इंगोले, नागनाथ विटकर, यशवंत गाडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी आपल्या जिवाची पर्वा न करता कार्य केलेल्या डॉ. माधुरी काळे, ग्राम विकास अधिकारी शिवाजी गायकवाड, माजी सरपंच गुणवंत मुंडे, आरोग्य सेवक इस्माईल सय्यद, पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी, तलाठी गणेश राजे, सविता ढवळे, रूपाली तट, अश्विनी नलवडे, पूजा इंगोले यांच्यासह सेट परीक्षेत उत्तीर्ण झालेली सारिका गडसिंग यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
अध्यक्ष बाळासाहेब माळी यावेळी बोलताना म्हणाले की, पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन, आरोग्य कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप, अन्नपूर्णा योजना राबवून एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. सूत्रसंचालन संजय माळी यांनी केले.