fbpx

डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन

कुतूहल न्यूज नेटवर्क
मुंबई:  डिजिटल मीडियामार्फत आज प्रचार प्रसार आणि वृत्तांकन अत्यंत वेगाने होत आहे. मात्र, तरीही या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना, मान्यता द्यायला सरकार सध्या तयार नाही. यात बदल व्हावा आणि सरकारने डिजिटल मीडियाला मान्यता द्यावी, असे डिजिटल मीडिया महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी म्हटले. संघटनेच्या मुंबईतील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
के. एल. प्रसाद (निवृत्त आयपीएस अधिकारी) यांच्याहस्ते तसेच सुरेश काकानी (सहआयुक्त, मुंबई महापालिका) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी, तुलसीदास भोईटे (उपाध्यक्ष), विजू माने (सिने दिग्दर्शक), अविनाश सोलवट (खासगी सचिव, उपमुख्यमंत्री महा. राज्य), संतोष काका ठोंबरे (अध्यक्ष, मातृभूमी प्रतिष्ठान बार्शी), अंगद म्हसकर (बाजीराव मस्तानी फेम), अभिजित चव्हाण (अभिनेते) यांची प्रमुख उपस्थिती होती. तर बार्शीवरुन कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी आणि लोकमतचे पत्रकार शहाजी फुरडे-पाटील हेही आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमाला राजा माने यांनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या स्थापनेची पार्श्वभूमी विशद करतानाच उपस्थितांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. तसेच, आगामी काळात डिजिटल मीडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत जाणार असल्याने या माध्यमाकडे सरकारनेही डोळसपणे बघण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. जगभरातील माध्यमांत डिजिटल मीडियाचा वापर होत आहे. पुढील २० ते ३० वर्षात हा मीडिया मोठ्या वेगाने वाढणार आहे. त्यामुळेच, सरकारने डिजिटल मीडियास मान्यता द्यावी, यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरु असून आवश्यकता असल्यास सरकारला सहकार्य करण्याचीही संघटनेची तयारी असल्याचे राजा माने यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, राजा माने व मुंबईचे अध्यक्ष संजय भैरे यांसह सहकाऱ्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर, मुंबईमधील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सरचिटणीस नंदकुमार सुतार यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *