कुतूहल न्यूज नेटवर्क : विजयकुमार मोटे
पंढरपूर: आरोग्यसेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शासकीय आरोग्य संस्था श्रेणीवर्धन व बांधकामासाठी आशिया विकास बँक यांच्यामार्फत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या निर्मितीसाठी चार कोटी ८०लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रांसाठी पाच कोटी निधी मंजूर : आमदार परिचारक
पंढरपूर तालुक्यातील सोनके, पेहे, शिरढोण, जळोली या गावांकरिता नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला प्रत्येकी एक कोटी २०लाख प्रमाणे निधी मंजूर झाला आहे, यामध्ये आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम करणे, उपकरणे, यंत्रसामुग्री, विज, पाणी आदी बाबींचा समावेश आहे. सदरचा निधी आशिया विकास बँकेकडून ७० टक्के व राज्य शासनाकडून ३० टक्के इतका मंजूर करण्यात आलेला आहे. पंढरपूर तालुक्यातील या चार प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला मंजूर अनुदान प्राप्त करण्यासाठी उपकेंद्राचे अंदाज व आराखडे शासनाकडे सादर करणे क्रमप्राप्त असून या अंदाज व आराखड्यामध्ये मुख्य इमारत, निवास व्यवस्था, फर्निचर, साहित्य सामग्री, वीज, पाणी, कंपाऊंड, अंतर्गत रस्ते या सर्व बाबींचा समावेश असावा असे नमूद केलेले आहे.
ही सर्व कामे जिल्हा परिषदेच्या मार्फत करण्यात येणार असून याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना करण्यात आल्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. यासाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ समाधान आवताडे, जि प सदस्या रजनीताई देशमुख, शोभा वाघमोडे, संगीता गोसावी, वसंत नाना देशमुख, सुभाष माने, रुक्मिणी ढोणे, पंचायत समितीच्या सभापती अर्चना व्हरगर, उपसभापती राजश्री भोसले आदींनी पाठपुरावा केला होता.