fbpx

सात दिवसांत सकारात्मक कृती दाखवा अन्यथा शिवसेनेच्या मंत्र्यांना जिल्हा बंदी-आ. राणाजगजितसिंह पाटील

कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ठाकरे सरकारने सातत्याने अन्याय केलेला आहे. शिवसेनेचे जिल्ह्यात ३ आमदार व १ खासदार असताना देखील खरीप २०२० चा मंजूर विमा बाधित शेतकऱ्यांना अजून पर्यंत मिळालेला नाही. ८० टक्के शेतकरी हक्काच्या नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. रब्बीचा विमा देखील मिळालेला नाही, खरीप २०२१ च्या अग्रिम विम्याचे आदेश होवून देखील प्रत्यक्षात काहीच कृती नाही आणि यात आताच्या नुकसानदायी अतिवृष्टीची भर. मग शिवसेना नेमकी शेतकऱ्यांसाठी काय करत आहे? हे समजून घेण्याची आता वेळ आली आहे. शिवसेनेने शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या विषयात आजवर काय मदत केली आहे? हे तातडीने जाहीर करावे व येत्या ७ दिवसांत पिक विम्याबाबत सकारात्मक कृती करावी अन्यथा शिवसेनेच्या मंत्र्यांना जिल्हा बंदी करून जाब विचारण्याचे काम शेतकऱ्यांसह भारतीय जनता पार्टी करेल असे आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हटले आहे.

खरीप २०२०  मधील पीकविम्याची मंजूर असलेली ३२ कोटीची रुपयाची नुकसान भरपाई विमा कंपनी संबंधित शेतकऱ्यांना अजूनही द्यायला तयार नाही. कृषी आयुक्तांचे आदेश असताना देखील वंचित ८० टक्के शेतकऱ्यांना विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास स्पष्ट नकार देते आणि कृषी मंत्री व मुख्यमंत्री याबाबत साधी बैठक देखील लावायला तयार नाहीत. या एका हंगामात केवळ उस्मानाबाद जिल्ह्यात विमा कंपनीला ५५० कोटींचा रुपयांचा नफा होणार आहे.

रब्बीच्या पीक विम्याबाबतही असेच झाले आहे. नुकसान मान्य केलेल्या शेतकऱ्यांना देखील देय रक्कम अदा करण्यात आली नाही. खरीप २०२१ च्या नुकसानीबाबत अग्रीम नुकसान भरपाई मंजूर असून देखील विमा कंपनीने हे मान्य करण्यास सपशेल नकार दिला आहे. आताची नुकसानदायी अतिवृष्टी तर अधिकची मारक ठरणार आहे. एवढे प्रचंड नुकसान झाल्यानंतर सुद्धा हक्काचा पीकविमा का मिळत नाही? हा शेतकऱ्यांसमोर खरा प्रश्न आहे. कृषी आयुक्त व विमा कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार शासन कृती करत नाही व राज्य तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून अपेक्षित निर्णय घेवून आदेश काढत नाही हे देखील संशोधनाअंती लक्षात आले आहे.

अशा परिस्थितीत सत्ताधारी लोकप्रतिनिधी, कृषिमंत्री व मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून नेमकं आजवर काय करत आले आहेत ? हे जनतेला समजणे आता आवश्यक झाले आहे. कृषी मंत्र्यांनी ही माहिती तातडीने जाहीर करावी व येत्या ७ दिवसांत पिक विम्याबाबत सकारात्मक कृती करावी, अन्यथा शिवसेनेच्या मंत्र्यांना जिल्हा बंदी करून जाब विचारण्याचे काम शेतकऱ्यांसह भारतीय जनता पार्टी करेल असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता.  100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *