कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी “पॅन इंडिया अवेयरनेस अँड आउटरिच प्रोग्राम” (PAN India Awareness and Outreach Program) या उपक्रमाअंतर्गत जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार तालुका विधीसेवा समिती बार्शी, वकिल संघ बार्शी आणि भारत विकास परिषद, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमात अंतर्गत कायदेविषयक जनजागृती व संपर्क अभियान संपुर्ण तालुक्यात राबविण्यात येत आहे.
ममदापूर येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर उत्साहात
या शिबिरांमधून कायदेविषयक जागृती, अन्यायाचा प्रतिकार, वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, कौटुंबिक हिंसाचार, लोकन्यायालय आणि मध्यस्ती या विषयांवर ग्रामीण भागातील जनतेला मार्गदर्शन केले जात आहे. दि.०७ नोव्हेंबर २०२१ रोजी बार्शी तालुक्यातील मौजे ममदापूर या गावांमध्ये जनजागृती व संपर्क अभियान राबविण्यात आले. यावेळी उपस्थितांना भारत विकास परिषद, बार्शी शाखेचे सचिव सुहास देशमुख यांनी जेष्ठ नागरीकांचे अधिकार व कौटुंबिक हिंसाचाराविषयी कायदे याविषयी मार्गदर्शन केले. विनायक घाडगे यांनी लोकन्यायालय व मध्यस्ती यांचा उपयोग करून ग्रामीण भागातील भांडण तंटे कसे कमी होतील याविषयी मार्गदर्शन केले.
या शिबीरांना तालुका विधीसेवा समितीचे गुरूदत्त पुकळे, भारत विकास परिषद बार्शीचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, कोषाध्यक्ष संतोष जोशी, बालाजी मोरे, ग्रामसेविक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटीलसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमांचे आयोजन तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१, बार्शी जयेंद्र सी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विधीसेवा समितीचे कर्मचारी आनंद पानगांवकर, विनायक घाडगे आणि भारत विकास परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. माणिक धारूरकर यांनी केले.