fbpx

कारी गावावर आता सीसीटीव्हीची नजर; ५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
द्राक्षाचे आगार म्हणून ओळख असलेले उस्मानाबाद तालुक्यातील कारी गाव तेरा सदस्य संख्या असलेली या गावची ग्रामपंचायत. गावामध्ये प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, वस्ती शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, डीसीसी बँक, लहान- मोठी दुकाने, शुक्रवारी आठवडी बाजार ही भरतो. (cctv now watching kari)

या गावामध्ये मागील चार महिन्यामध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत सोयाबीन पोती, मोटारसायकल लंपास, आठवडी बाजारातून मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. ग्रामस्थांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली होती. दरम्यान याला आळा घालण्यासाठी तसेच गावच्या सुरक्षिततेसाठी कॅमेरे बसवण्याचा निर्णय ग्रामपंचायत कडून घेण्यात आला. ग्राम निधीतून पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रस्त्यावर सीसीटीव्हीची नजर असल्यामुळे गैरकृत्य करणाऱ्यांनाही मोठा चाप बसणार आहे.

बुधवार (दि२६) सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पांगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल व उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर सरपंच निलम कदम, उपसरपंच खासेराव विधाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान नाईकवाडी होते.

ग्रामपंचायत कार्यालयासमोर, पांगरी-अंबेजवळगे रोड, कारी-गोरमाळे रोड, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयामधील एका स्क्रीन वरून निरीक्षण केले जात आहे. लाईट गेल्यावर देखील सीसीटीव्ही कॅमेरे चालू राहावेत यासाठी ही पॉवर बॅक अपची सोय करण्यात येणार आहे.

पोलीस निरीक्षक सुरेश साबळे म्हणाले की आज चोऱ्या सगळीकडे होत आहेत. आपण प्रयत्न करू तेवढे कमीच असतात. नवीन नवीन हातखंडे चोर वापरत असतात. त्यामुळे छोटासा सहभाग म्हणून ग्रामपंचायत मार्फत सीसीटीव्ही बसवण्याचा अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला आहे. गावामध्ये जास्तीत जास्त कॅमेरे आणि जास्त लेन्स चे कॅमेरे वापरले तर प्रत्येक गल्ली, बोळ तुम्हाला दिसू शकेल. जे चोर, लफंगे आहेत त्यांना या सीसीटीव्ही कॅमेरामुळे वचक बसेल.

चांगल्या गोष्टीला सतत पुढाकार घेणारे व चांगली गोष्ट पार पाडणारे पांगरी पोलिस स्टेशन हद्दीमधील कारी गाव आहे. गाव मोठे असूनगावांमध्ये आजूबाजूच्या गावातून नागरिकांचे येण्याचे प्रमाण जास्त असून चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. सीसीटीव्ही कॅमेरेचा उपयोग निश्चितच चांगल्या कामासाठी होणार असून चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होणार नाही. परंतु चौकाचौकात बसणारे इतर काही लोक आहेत यांच्यावर वचक राहणार आहे. याचा आम्हाला खूप थोडे दिवस फायदा होईल असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी व्यक्त केले.

यावेळी ग्रा.पं. सदस्य राजाभाऊ गादेकर, ग्रा.पं.सदस्य अतुल चालखोर, ग्रा.पं. सदस्य अमोल तेलंगे, राजेंद्र डोके, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल चौधरी, जमीर मुलाणी, दत्तात्रय सारंग, राहुल पकाले, अनिल कदम, रवींद्र आटपळकर, कामराज बनसोडे, विलास सारंग, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी अनंत सोनटक्के यांनी तर आभार मुरलीधर खरटमल यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *