कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: शेतकऱ्यांना वाईन निर्मितीसाठी अनुदान देण्याची व वाईन निर्मिती उद्योगासाठी जाचक अटी व नियम शीतल करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याबाबतची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली.
शेतकऱ्यांना वाईन निर्मिती प्रकल्पासाठी अनुदान द्या- धीरज शेळके
या मागणीचे निवेदन बार्शी तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी छावा संघटनेचे बार्शी तालुका अध्यक्ष धिरज शेळके, सहजीवन संस्थेचे बालाजी डोईफोडे आदी उपस्थित होते. नुकताच महाराष्ट्र शासनाने खुल्या बाजारामध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतलेला आहे आणि सदरचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे सांगितले आहे, परंतु या निर्णयाचा शेतकऱ्यांना कसलेही प्रकारचा फायदा होणार नाही. कारण वाईन निर्मितीचे सर्व कारखाने धनदांडग्या व मोठमोठ्या राजकारण्यांचे आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेतमाल हा कवडीमोल किमतीने घेतला जाणार हे मात्र नक्की. खऱ्या अर्थाने शेतकरी सक्षम बनवायचा असेल तर वाईन निर्मितीसाठी शेतकऱ्यांना परवानगी द्यावी आणि वाईन निर्मिती करण्यासाठी ज्या जाचक अटी व नियम आहेत त्या शिथील करून साध्या आणि सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना परवानगी देऊन उद्योग निर्मितीसाठी अनुदान देण्याची मागणी छावा संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याचे छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष धीरज शेळके यांनी सांगितले.