कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त हिंदवी समाचार व श्री दत्त बालचिकित्सालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मराठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये बार्शी शहर व तालुक्यातील विविध शाळांमधील तेराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
बार्शीत मराठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये तेराशे विद्यार्थ्यांचा सहभाग
बार्शी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या, श्री संत तुकाराम सभागृह व महाराष्ट्र उच्च प्राथमिक विद्यालय या ठिकाणी या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्शीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत जाधव, स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे, शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक गुंड, श्री दत्त बालचिकित्सालयाचे बालरोग तज्ञ डॉ. जितेंद्र तळेकर, वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, अक्षर स्वच्छ, सुंदर, वळणदार व रेखीव लिहिण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. कोरोनाच्या काळामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शालेय व विविध उपक्रम पासून वंचित राहावे लागले, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी सुवर्णसंधी असल्याने विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असल्याचे हिंदवी समाचारचे मुख्य संपादक धीरज शेळके यांनी सांगितले. या स्पर्धा १ ली ते ४ थी प्राथमिक गट, ५ वी ते ७ वी उच्च प्राथमिक गट व ८ वी ते १० वी माध्यमिक गट या तीन गटामध्ये घेण्यात आल्या.
प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणात देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी दयानंद रेवडकर, प्रा. जयद्रथ गायकवाड, उमेश चव्हाण, सतीश होनराव, वीरेंद्र बंडे, प्रा. प्रेमसागर राऊत, प्रा. सागर डुरे, संभाजी नवले, संतोष बनसोडे, मयूर माने यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती जाधव व साक्षी बलदोटा यांनी केले तर आभार धिरज शेळके यांनी मानले.