कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: महाराष्ट्र राज्य नाट्य परिषदेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय १८ व्या बालनाट्य स्पर्धेला रविवारपासून बार्शीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या दुष्काळ या बालनाट्याने स्पर्धेची तिसरी घंटा वाजली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रंगभूमी व नटराज मूर्तीचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ स्तर न्यायाधीश तेजवंतसिंह संधू, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे, जिल्हा सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षा कविता कदम, कलायात्री सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण गाढवे आदी उपस्थित होते.
बार्शीत बालनाट्य स्पर्धेची तिसरी घंटा वाजली
यावेळी रणभूमीवर बोलताना न्यायाधीश तेजयवंतसिंग संधू यांनी सहभागी संघांना आणि नाट्य कलाकारांना संबोधित करत म्हटले की, नाट्य सादरीकरण करत असताना वर्तमानात या, आपल्या मधील माणूस ओळखा, स्वतःला विचारा, स्वतःला पहा, स्वतःला समजा, स्वतःला शक्ती द्या आणि मग सादरीकरणाला सुरुवात करा असे म्हणत जेष्ठ गायक पंडित विष्णू पणीसकर यांचे उदाहरण देत बालकलाकारांना शुभेच्छा दिल्या. कलायात्री सांस्कृतिक व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १८ व्या बालनाट्य स्पर्धेचे आयोजन येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवनात करण्यात आले आहे. ही स्पर्धा २३ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या स्पर्धेत रविवारी दुष्काळ, स्वच्छता साक्षरता गाव आणि सदाफुली रंगीत झाली आदी बालनाट्य सादर करण्यात आल्याचे स्पर्धा प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या स्पर्धेसाठी स्पर्धक म्हणून जेष्ठ रंगकर्मी प्रा. गिरीष भूतकर, प्रा. केशव भागवत, प्रा. बाळासाहेब नवले यांनी काम पाहिले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रवीण गाढवे यांनी केली तर सूत्रसंचालन क्षितिजा गायकवाड यांनी केले. (The third bell of the children’s drama competition rang in Barshi)