कुतूहल न्युज नेटवर्क -विजयकुमार मोटे
विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींस चौथ्यांदा केला वज्रलेप
पंढरपूर दि.25 : सावळ्या विठुरायाला आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तींना केला वज्रलेप. हि प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण केली. याआधी तीन वेळा दोन्ही मूर्तींना वज्रलेप करण्यात आला.
१९ फेब्रुवारी १९८८ साली मूर्तीवर पहिल्यांदा एपॉक्सीचा लेप देण्यात आला होता. यानंतर २४ मार्च २००५ आणि शेवटची प्रक्रिया १८ ते २० मार्च २०१२ मध्ये वज्रलेप करण्यात आला होता. खरतरं दर पाच वर्षांनी लेप द्यावा अशा सूचना पुरातत्व विभागाच्या होत्या. मात्र, गेली आठ वर्षे याकडे दुर्लक्ष झाले होते.
मात्र, आता १६ मार्च रोजी मंदिर समितीच्या माध्यमातून विधी व न्याय खात्याकडे विठ्ठलमूर्तीला वज्रलेप करण्याची परवानगी मागितली होती, त्याला 4 जुन रोजी परवानगी मिळाली. हा वज्रलेप आषाढी एकादशी पूर्वी करणे आवश्यक होते त्याठी मंदिर समितीने केलेल्या प्रयत्नांना यश आले.
सध्याच्या स्वयंभू मुर्तीला दिवसातुन एकदा तरी दही, दुधाचा अभिषेक केला जातो. तसेच प्रत्येक भाविक पद दर्शन घेतो त्यामुळे मुर्तीची झिज होत आहे. हि झिज थांबवण्यासाठी वज्रलेपन केले जाते. अशी माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांनी विठ्ठल जोशी यांनी दिली.
भारतीय पुरातत्व विभाग, पुरातत्व रसायनतज्ज्ञ,संवर्धन संशोधन प्रयोगशाळा तर्फे पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली देवाच्या मूर्तीला वज्रलेप करण्यात आले. दोन दिवस चालणाऱ्या या लेपनात पहिल्या दिवशी दि.23 रोजी मूर्तीची स्वच्छता केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. 24 जुन रोजी वज्रलेपन (रासायनिक लेपन) करून पुर्ण झाले.