कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे: असोसिएशन ऑफ ब्यूटी थेरपी अँड कॉस्मेटोलॉजी म्हणजेच ए बी टी सी (भारत) च्यावतीने पुण्यात येत्या १९ जुलै रोजी वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात सौंदर्यशास्त्रातील राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेमध्ये सौंदर्यशास्त्रामधील अत्याधुनिक इलाज, अत्याधुनिक उपकरण त्यांचा वापर तसेच त्या संदर्भातली सर्व शास्त्रीय माहिती मार्गदर्शन अत्याधुनिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील रंगभूषा केशभूषा त्याला लागणारे साहित्य साधनं यांच्या वापराविषयी शास्त्रोक्त माहिती तज्ञांच्यामार्फत देण्यात येणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा मनोरमा कांतावाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अध्यक्षा डॉ. स्मिता देव, सचिव डॉ. अंजली जोशी, कोषाध्यक्ष तृप्ती शहा, शिक्षण प्रभारी अजिता सुर्वे आणि नम्रता गौड आदी उपस्थित होत्या.
पुण्यात सौंदर्यशास्त्रावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
कोरोना काळात लॉकडाऊन मुळे सौंदर्यक्षेत्रातील व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले. अनेकांनी कर्ज काढून सलून, पार्लर्समधे गुतवणूक केली होती. त्याच्यावर उपासमारी ची वेळ आली. अशा परिस्थितीत संस्थेने पुण्यात तसेच पुण्याबाहेरील अनेक सौंदर्याक्षेत्रातील व्यवसायिकांना आर्थिक मदत करून परत एकदा व्यवसायास सुरवात करण्याची संधी दिली. वस्ती पातळीवरील महिला, मुली, तृतीयपंथी यांना संस्थेने सौंदर्य शास्त्राचे प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे.
आज भारतातील सौंदर्य आणि स्वास्थ्य क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. या क्षेत्राच्या विस्तारामुळे येथे नोकरी आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी वाढताना दिसत आहेत. हे क्षेत्र वैद्यकीय पेशाशी संलग्न (पॅरा मेडिकल) असल्या कारणाने योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तसेच सौंदर्य क्षेत्रात खूप विविध नवनवीन उपचार पद्धती, विविध तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे विविध मार्गदर्शन शिबिर, परिषद या माध्यमातून सौंदर्य क्षेत्रातील सर्व घडामोडींबाबत व्यावसायिकांना जागरूक आणि शिक्षित करणे हे संस्थेचे काम राष्ट्रीय पातळीवर चालते आणि त्या साठी राष्ट्रीय पातळीवर आयोजित परिषदेत विविध सौंदर्य शाखेचे तज्ञ येऊन व्याख्यान, प्रात्यक्षिक या द्वारे मार्गदर्शन करतात. ही परिषद संस्थेची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व सौंदर्य तज्ञ महिला आणि पुरुषांना विनामूल्य असते.
येत्या १९ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत तृतीयपंथी आणि स्वाधार संस्थेच्या वंचित गटातील युवती रॅम्पवॉक च्या माध्यमातून आपले सौंदर्यशास्त्रातील कौशल्य सादर करून परिषदेचा समारोप करणार आहेत.