कुतूहल न्यूज नेटवर्क -विजयकुमार मोटे
संचारबंदीत पंढरीत अशी होणार विठ्ठलाची महापूजा
पंढरपूर (दि. ३०) : कोरोना रोगाच्या नियंत्रणासाठी संचारबंदी मध्ये पार पडणार आषाढी एकादशी . यासाठी शासनाने केलेल्या नियोजनाची पुढील प्रमाणे करणार अंमलबजावणी.
संचारबंदी –पंढरपूर शहरासह आसपासच्या १० किमी ग्रामीण परिसरात आज मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून ते गुरुवारी दि. २ जुलै च्या रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या काळात नागरिकांना अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर पडता येणार नाही.
महापूजेसाठीचा मानाचा वारकरी कोण?
आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री यांच्या हस्ते केली जाते व होणार आहे. वारीच रद्द झाल्याने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर महापूजा करण्याचा मान कोणाला मिळेल याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मंदिर समितीने बैठक घेऊन हा मान श्री.विठ्ठल ज्ञानदेव बढे (वय-८४) यांना देण्यात आला आहे. ते नगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ या गावचे रहिवासी आहेत. ते मंदिरात विणेकरी म्हणुन सेवा करत. हा मान शेतकरी संघटनेनी शेतकऱ्याला तर एका नगरसेवकाने स्वच्छता कामगारास मिळावा अशी मागणी केली होती. शेवटी हा मान अखंड सेवा करणारी बढे यांना मिळाला.
कोणकोणत्या मानाच्या ९ पालख्या व त्यांचे आगमन व परतीचा प्रवास…. कसं?
आषाढी वारीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाच जिल्ह्यांतून येणाऱ्या मानाच्या ९ पालख्यांना अटी व शर्ती वर प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे. आज दि.३० वार मंगळवारी रात्री ९ वाजे पर्यंत या पालख्या पंढरपुर मध्ये पोहोच होतील. पालख्यांसोबत मानाचे असे २० वारकरी असतील की, ज्यांची कोविड-१९ ची चाचणी केलेली असेल. वृद्ध वारकरी यांना प्रवेश दिला जाणार नाही. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी -आळंदी,संत तुकाराम महाराज पालखी-देहू ,संत सोपानदेव पालखी -सासवड, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी- त्र्यंबकेश्वर, संत मुक्ताबाई पालखी-मुक्ताईनगर, संत एकनाथ महाराज-पैठण संत नामदेव महाराज पालखी-पंढरपुर, विठ्ठल-रखुमाई पालखी-कौंडण्यपुर २ जुलै ला दुपारी ४ वाजल्यानंतर आप आपल्या संस्थानाकडे पंढरपूर मधुन प्रस्थान करतील.
हेही वाचा -अबब ! ६० हजारांच्या स्कूटरसाठी चक्क १८ लाखांची नंबर प्लेट
महापूजा व मंदिर प्रवेश-बुधवारी दि.१ जुलै रोजी पहाटे २ वाजता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात येईल. यावेळी मंदिर समितीने ठरवलेले मानाचे वारकरी बढे हेही उपस्थित असतील. यासाठी मुख्यमंत्र्यांसोबतच्या महत्त्वाच्या व्यक्ती आणि पालखी प्रमुखांना प्रवेशपत्रिका व पादुकांसह मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच काही निवडक अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेश करण्यास परवानगी असेल.
लाईव्ह दर्शन –विठ्ठल मंदिर बंद असल्याने विठ्ठलाचे दर्शन व महापुजा भाविकांना लाईव्ह पाहण्यासाठी श्री. “विठ्ठल रुक्मिणी देवस्थान” या मोबाईल अॅप ची सोय केली आहे. तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पंढरपुरात परिसरात गर्दी करु नये व सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायझर वापर करून वृत्त संकलन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मंदिरातील महापुजेचे व्हिडिओ , फोटो इत्यादींचे कव्हरेज ई-मेल द्वारे देण्याची व्यवस्था जिल्हा माहिती कार्यालयांने केली आहे.
बंदोबस्त-वारी मध्ये महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी १५०० पोलिस व एक राज्य राखीव पोलीस दल बंदोबस्ताचे काम करेल.
या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख व इतर प्रशासकीय अधिकारीही हजर होते.