कुतूहल मीडिया ग्रुप
बार्शी: बार्शीतील हिंदू खाटीक समाजाच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्यात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम गुरुवार, दि. ५ जून २०२५ रोजी सोलापूर रोडवरील व्ही. के. मार्ट समोरील हिंदू खाटीक समाज सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, हिंदू खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणराव गालिंदे, माजी अध्यक्ष व्यंकट बेंद्रे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश सचिव पार्थ गालिंदे, युवा प्रदेशाध्यक्ष रोहित थोरात, जिल्हाध्यक्ष रवींद्र गायकवाड, बार्शी अध्यक्ष शिवाजीराव जठार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र राऊत म्हणाले की, खाटीक समाज हा मेहनती, प्रामाणिक आणि प्रगतीशील समाज आहे. समाजासाठी सभागृहाची गरज लक्षात घेऊन आमदार निधीतून ३५ लाख रुपये खर्च करून हे सभागृह उभारले आहे. या ठिकाणी संरक्षण भिंत, पाणीपुरवठा (बोअरवेल) व स्वच्छतागृह उभारणीची व्यवस्था करण्यात येईल.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानाने समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळते, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले तसेच गरजू मुला-मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजाच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात सभागृहाचे बांधकाम करणारे ठेकेदार अभिजीत डिडवळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी समाजातील महिलांची आणि युवकांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निता देव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खाटीक समाजातील बांधव व युवक वर्गाने विशेष मेहनत घेतली.