कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे : दयानंद गौडगांव
बेंगळुरू- मुंबई महामार्गावर साताराकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या माल ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर असलेल्या आठ वाहनांना धडक दिली. या अपघातात ४ चारचाकी, ३ रिक्षा वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी सकाळी नवले पुल येथे घडली.
पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; आठ वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने निघालेला माल ट्रक ( क्रमांक : डी डी ०१ सी ०४६७ ) सकाळी नवले पुल व वडगांव पुल येथील हॉटेल विश्वास समोर आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने समोरच असणाऱ्या ४ चारचाकी वाहनांना व ३ रिक्षाला जोरदार धडक दिली, त्यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. तर ८ गाड्यांचे नुकसान झाले आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अंकुश कर्चे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी जखमींची माहिती घेतली. सकाळी झालेल्या या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.