fbpx

बार्शीत अप्पर पोलीस अधीक्षकांची कारवाई: 30 दिवसांसाठी मोबाईल शॉपी सील

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी: कोव्हीड 19 (covid 19) संसर्गजन्य रोगाचा प्रसार अतिशय झपाट्याने वाढत असल्याने शुक्रवार (दि.०२ एप्रिल) सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत धाराशिवकर व बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोषगिरी गोसावी व पोलीस पथक यांना सोबत घेऊन संपूर्ण बार्शी शहरांमध्ये करोना च्या पार्श्वभूमीवर पाहणी केली.

दरम्यान कोरोना अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारीची उल्लंघन केल्याच्या कारणावरून पांडे चौकातील एस एस मोबाईल्स हे दुकान ३० दिवसांसाठी सील केले. या छोट्याशा मोबाईल दुकानांमध्ये विक्रेते व ग्राहक असे मिळून एकूण वीस जण उपस्थित होते. सामाजिक अंतर (Social distancing) देखील ठेवले नव्हते, तसेच ग्राहकांपैकी बऱ्याच जणांनी मास्कचा वापर केलेला नव्हता तसेच दुकानांमध्ये सॅनिटायझर देखील उपलब्ध ठेवलेले नव्हते. या कारणास्तव दुकान 30 दिवसांसाठी सील करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

व्ही के मार्ट (V K Mart) या ठिकाणी देखील त्यांनी भेट दिली व त्या ठिकाणी मास्क न वापरलेल्या ग्राहकांवर कारवाई केली तसेच मार्टच्या मालकांना कोरोना अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या. बाजारपेठेमध्ये वीणा मास्क असणाऱ्या फळ विक्रेत्यांवर देखील त्यांनी कारवाया केल्या. अशाप्रकारे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना न करणाऱ्या दुकानदार/ व्यापारी/ फळ विक्रेते तसेच नागरिकांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल.

दुकानदारांनी/ व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने वेळेत बंद करावीत तसेच दुकानांमध्ये विना मास्क कोणालाही प्रवेश देऊ नये. दुकानांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल याची खबरदारी घ्यावी तसेच मास्कचा वापर हा अनिवार्य राहील. हॉटेल व्यवसायिकांनी सायंकाळी आठ वाजेनंतर ग्राहकांना केवळ पार्सल सुविधा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.

संपूर्ण बार्शी शहरामध्ये पोलीस प्रशासनाकडून वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून त्यांच्याद्वारे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात येत आहे. दिवसभरात शंभरपेक्षा अधिक लोकांवर मास्क न वापरल्यामुळे कारवाई करण्यात आलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *